जवळाबाजार रोडवर पिं.राजा येथील व्यापाऱ्याला अडीच लाखाने लुटले !

111

काळ्या रंगाच्या पल्सरवरुन आले होते; दोन भामटे

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा-(19 NOV.2023) चोरट्यांचे नेटवर्क पोलिसांपेक्षा पावरफुल असल्यामुळे ते बिनधास्त ‘ना भय ना भिती, हम है यहा के सिंकदर’ या ऐटीत राजरोसपणे वावरत त्यांनी पिंपळगाव राजा येथील एका व्यावसायीकाला 18 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता नांदुरा तालुक्यातील जवळाबाजार येथे लुटून त्यांच्याकडून रोख 2 लक्ष 30 हजार व मोबाईल असा एकूण 2 लक्ष 33 रुपये घेवून पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसात ‘त्या’ दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील सय्यद अमिनोउद्दीन सय्यद शमसोद्दीन सय्यद यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे तरवाडी ते पिंपळगाव राजा रोडवर लकी ट्रेडर्स नावाचे हार्डवेअरचे दुकान असून ते सिमेंट, आसारी, टिनपत्रे, लोखंडी पाईपसह आदी साहित्याची विक्री करतात. ते मलकापूर येथील केजी ट्रेडर्स येथून हार्डवेअरचे सामान खरेदी करतात. दुकानात हार्डवेअरचे सामान आणण्यासाठी त्यांनी काही दिवसाआधी दुकानातील जमा झालेले पैसे घेवून ते 18 नोव्हेंबर रोजी पिंपळगाव राजा येथून तरवाडी मार्गे आपल्या दुचाकी क्र.MH-28 AA-0551 ने मलकापूरकडे जात असतांना नांदुरा तालुक्यातील जवळाफाटा ते जवळाबाजार दरम्यान त्यांना दुपारी 3 वाजता फोन आला असता त्यांनी दुचाकी बाजुला थांबवून फोन घेतला.

यावेळी तरवाडी फाट्यापासून दोन इसम काळ्या रंगाच्या पल्सरवर आले व ‘गाडी बाजुमे लगा’ असे म्हणत दोन्ही इसम खाली उतरवून पल्सर चालविणाऱ्या चोरट्याने सय्यद अमिनोउद्दीन यांच्या दुचाकीची चाबी काढून फेकून दिली तर दुसऱ्या चोरट्याने फिर्यादीच्या दुचाकीवरील रोख 2 लक्ष 30 हजार रुपये असलेली थैली व तीन हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पल्सर गाडीवर बसून तरवाडी फाट्याकडे धूम स्टाईलने पळून गेल्याच्या फिर्यादीवरुन दोन्ही अज्ञात चोरट्यांवर बोराखेडी पोलिसांनी भादंवीचे कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर चोरी भरदिवसा झाल्याने परिसरातील नागरिक भयभित झाले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

असे आहे चोरट्यांचे वर्णन

एका चोरटा उंच, शरिरबांधा मध्यम असून त्याने निळ्या रंगाची जिन्स व पांढऱ्या रंगाचे शर्ट घातलेले होते. डोळ्याला चौकोनी फ्रेमचा काळा चश्मा लावलेला होता. तर दुसऱ्या चोरट्याची उंची मध्यम असून त्याने काळ्या रंगाची पॅन्ट व बदामी रंगाचे शर्ट घातले होते, असे फिर्यादीत नमूद असल्याने सदर चोरट्यांना पकडणे बोराखेडी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.