Friday, May 22, 2026
Home Buldana लाच मागणाऱ्यांवर देशद्रोह/खंडणीचा गुन्हा दाखल करावा

लाच मागणाऱ्यांवर देशद्रोह/खंडणीचा गुन्हा दाखल करावा

49

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन.जैन यांचे पंतप्रधानांना निवेदन

बुलढाणा- लाचखोरीच्या गुन्ह्यासाठी कडक कायदे व निव्वळ खटला पुरेसा नसून लाखखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर देशद्रोह व खंडणीचा गुन्हा तसेच प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवित प्रकरणाचा तीन वर्षाच्या आत सोक्षमोक्ष लावण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन.जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यासह देशात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकाच अधिकाऱ्यावर दोन तीनवेळा कारवाई होऊन देखील त्याची पैसे घेण्याची हाव सुटत नाही. कोणत्याही शासकीय कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे काम होत नाही. सर्वसामान्य नागरिकांनी पैसे न दिल्यास शासकीय अधिकारी पध्दशीरपणे खुटी ठोकतात.जिल्हा परिषद, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालविकास विभाग, तलाठी, ग्रामसेवक येथे सर्वसामान्य नागरिकांची कामे बिना पैशाने होत नाही. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागतात. पुर्वी एखाद्यावर आरोप देखील झाल्यास ते घराबाहेर निघत नव्हते. त्यावेळी चुकीचा देखील आरोप झाला असेलतर त्यावेळी त्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. परंतु आजच्या अधिकाऱ्यांची मुजोरी वाढलेली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यास अधिकारी थोड्या काळासाठी तुरुंगात गेल्यावर ते लाचखोर अधिकारी त्यांच्या कमावलेल्या अवैध पैशामुळे जामिन घेवून सुटका करुन घेतात. नंतर खटले वर्षानुवर्ष कोर्टात चालू राहत असल्यामुळे त्यांना कायद्याची भिती राहिलेली नाही आणि भ्रष्टाचार करण्याची एक सुरक्षीत वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. पैशाची मागणी करणाऱ्यावर खंडणी व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर प्रकरण फास्टटॅक कोर्टाद्वारे चालवून त्या प्रकरणाचा निकाल तीन वर्षाच्या आत लावण्यात यावा. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत त्याला सेवेतून निलंबीत करण्यात यावे. त्यानंतर संवेदनशील किंवा महत्वाच्या पदाची जबाबदारी देवू नये. दोषी ठरल्यास त्याला केवळ सेवेतून बडतर्फेच करावे असे नाही, तर त्याला पेन्शनसह सर्व सवलती रद्द करुन भरपाई म्हणून जबरदस्तीने लाचखोरीतून कमावलेली सर्व मालमत्ता जप्त करण्याची मागणी करीत याकडे लक्ष देवून यासाठी कठोर कायदे आणि धोरणे राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन.जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Don`t copy text!