Monday, May 25, 2026
Home Buldana सैलानी बाबा यात्रेच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; 2 मार्चला पेटणार नारळाची होळी;...

सैलानी बाबा यात्रेच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; 2 मार्चला पेटणार नारळाची होळी; 8 मार्चला निघणार संदल मिरवणूक

54

बुलढाणा: (शासकीय वार्ता)तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा दर्गा परिसरात साजऱ्या होणाऱ्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाच्या तयारीला गती आली आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची आढावा बैठक त्यांच्या कार्यालयात 13 जानेवारी रोजी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संदल मिरवणूक ग्रामपंचायत पिंपळगाव सराई येथून मुजावर परिवाराच्या संदल घरातून रात्री ८ वाजता निघून गावातील प्रमुख मार्गांवरून परिक्रमा करत जंगलगाठ रस्त्याने सुमारे ४ किमी अंतर पार करून रात्री १२ वाजता सैलानी बाबा दर्गा येथे पोहोचेल. १२ मार्च रोजी फातेखानी कार्यक्रमानंतर सैलानी बाबा ट्रस्टकडून प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता होईल. यात्रा व्यवस्थापनासाठी महसूल विभाग, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, विद्युत वितरण कंपनी, सैलानी बाबा दर्गा ट्रस्ट, मुजावर, ग्रामपंचायत पिंपळगाव सराई व घाटनांद्रा, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद बुलढाणा/चिखली, पशुसंवर्धन विभाग, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेत यात्रा शांततामय, सुरक्षित व सुव्यवस्थित पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सैलानी बाबा सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान

सैलानी बाबा दर्गा हे सर्व जाती-धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने यात्रेत बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा अंदाजे ५ ते ७ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

8 मार्चला निघणार संदल

सैलानी बाबा यात्रा महोत्सव २५ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत होणार आहे. यात्रेदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ मार्च रोजी नारळाची होळी पेटविण्यात येणार असून, त्यानंतर यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. ८ मार्च (पंचमी) रोजी संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त;तिसऱ्या डोळ्यांची नजर

सैलानी बाबा यात्रा परिसराची अधिकाऱ्यांनी पाहणी करून रस्ते दुरुस्ती, कडेकोट पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा, अखंड वीजपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, दर्गा व शौचालयांसाठी पाणी-साफसफाई व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजन व बॅरिकेटिंगसह पार्किंग, भाविकांसाठी एसटीच्या अतिरिक्त बस सेवा, हाराशीद्वारे दुकानदारांना जागा, अन्न पदार्थ तपासणी, नारळ होळी व बळी प्रथेसाठी स्वतंत्र जागा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती फलक, आरोग्य शिबिरे (डॉक्टर, रुग्णवाहिका व औषधसाठा), अग्निशमन वाहने, मदत कक्ष व उद्घोषणा यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिले.

 

Don`t copy text!