गणेश वाघ
तळणी- मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोताळा तालुक्यातील तळणी परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार वाढला आहे. 23 डिसेंबर रोजी एका बोकड्याचा फडशा पाडल्याची घटना घडली होती. आज गुरुवार 15 जानेवारीच्या सकाळी 4 वाजेच्या सुमारास बिबट्याने आपल्या परिवारासह येत अडीच वर्षाच्या वासरीवर झडप घेत तिचा फडशा पाडल्याची घडना समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून संदीप तायडे या शेतकऱ्याचे 20 हजाराचे नुकसान झाले आहे.
तळणी गावातील हनुमान नगर बिबट्याने 23 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कुसुमबाई तायडे यांच्या बोकड्यावर हल्ला चढवित त्याचा फडशा पाडला होता. या घटनेला 23 दिवसाचा कालावधील उलटत नाहीतर आज 15 जानेवारी रोजी सकाळी चार साडेचार वाजेच्या सुमारास बिबट्याने परत तळणी येथील हनुमान नगर येथील संदीप तायडे यांच्या वाड्याकडे चाल करीत त्यांनी वाड्यात बांधलेल्या अडीचवर्षाच्या वासरीला लक्ष करीत वासरीचा अर्धा कि.मी. अंतरापर्यंत फरफटत नेत तिचा फडशा पाडला. यामुळे संदीप काशिनाथ तायडे 20 हजाराचे नुकसान झाले. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असून शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याकडे मोताळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून सदर हिस्त्रप्राणी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुपालक शेतकर्यांकडून होत आहे. पंचनामा करुन शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. वृत्तलिहेपर्यंत मोताळा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते, हे विशेष!
परिवारासह आला अन् पाहुणचार खावून गेला
मोताळा वनपरिक्षेत्रात बिबट्यांची संख्या दिवसेंनदिवस मोठ्या झपाट्याने वाढत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बिबट्याने आज सकाळी वासरीवर हल्ला करीत तिचा फडशा पाडला. ग्रामस्थांनी सदर ठिकाणी पोहचले. यावेळी शेतात आढळलेल्या ठशावर बिबट्यासोबत 3 ते 4 चिमुकली पिल्ले असल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्या परिवारसह आला अन् पाहूणचार खावून गेल्याची तळणी परिसरात चर्चा आहे.



























