डॉक्टरांच्या निवेदनामुळे फुटले बिंग; आता मुख्याधिकारी
काय कारवाई करतात? सर्वांचे लक्ष !!
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (21.JULY.2023) – राजकारणात सक्रीय राहण्यासाठी कोणी कोणत्याही स्तराला जात आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका गावात तिसरे अपत्य प्रकरण अंगलट येवू नये म्हणून एका महिला ग्रा.पं.सदस्याने तिसऱ्या अपत्याला जन्म देवून देखील ते मी नव्हेच, अशी भूमिका घेवून चक्क दुसऱ्या महिलेच्या नावाची नोंद करुन तशी माहिती संबंधित हॉस्पीटलला दिल्याने तशी जन्माची नोंद जिल्ह्यातील एका न.प.प्रशासनाने केली आहे. ती बदलविण्यासाठी आता एका डॉक्टरने सदर नोंद रद्द करुन त्या ठिकाणी खऱ्या मातेच्या नावाची नोंद करण्याची मागणी 20 जुलै रोजी एका निवेदनाद्वारे संबंधित नगर परिषद प्रशासनाकडे केल्याने सदर ग्रा.पं.सदस्याला तिसरे अपत्य झाल्याचे बिंग फुटले.
जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद सर्कलमधील 13 ग्रा.पं.सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये 7 सदस्य सत्ताधाऱ्यांकडे तर विरोधकांकडे 6 सदस्य आहेत. प्रत्येक गटाचे एक-एक असे दोन सदस्य जात वैधता पडताळणीमध्ये गेल्या 12 महिन्यापासून अपात्र झालेले आहे. तर एका तिसऱ्या महिला सदस्याला तिसरे अपत्य झाले आहे. शासनाच्या नियमानुसार तिसरे अपत्ये झाल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते, सदस्यपद वाचविण्यासाठी त्या महिलेची एप्रिल 2023 मध्ये जिल्ह्यातील एका हॉस्पीटलमध्ये प्रसूती झाली असतांना सदस्यपद वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक व त्यांनी हॉस्पीटल प्रशासन व शासनाची दिशाभूल करुन दुसऱ्या महिलेच्या नावाने नोंद केल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत संबंधित हॉस्पीटल प्रशासनाने कागदपत्रांची पडताळणी केली असता सदर बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी 20 जुलै रोजी जिल्ह्रयातील एका मुख्याधिकारी यांच्याकडे लिखीत तक्रार करुन नगर परिषद येथे नोंद झालेल्या ‘त्या’महिलेची नोंद रद्द करुन प्रसूती झालेल्या महिलेच्या नावाने करण्याची मागणी केल्याने सर्व प्रकार उघडकीस आला आहे. असे प्रकार घडू नये, यासाठी भविष्यात हॉस्पीटल प्रशासनाने बाळाला जन्म देणाऱ्या आई व वडिलांच्या आधारकार्डची पडताळणी केल्यानंतरच न.प. प्रशासनाकडे जन्माची नोंद करावी, अशी सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे.
हा खोटारडेपणा कश्यासाठी?
राजकारणात आपले वर्चस्व व आपले पद शाबूत राखण्यासाठी कुणी कुठल्याही स्तराला जावू शकते, असाच एक प्रकार जिल्ह्यातील एका गावात उघडकीस आला आहे. एका महिला सदस्याने सदस्यपद वाचविण्यासाठी आपली प्रसूती लपवून दुसऱ्याच महिलेची प्रसूती झाल्याची नोंद केल्याचा प्रकार जिल्ह्यातील एका डॉक्टरच्या लक्षत येताच त्यांनी संबंधित विभागाकडे 20 जुलै रोजी मागणी केल्याने ‘त्या’ महिलेने हा खोटारडेपणा कश्यासाठी केला, असा उपस्थित होत आहे.