बिबट्याने 12 बकऱ्यांचा पाडला फडशा; दीड लाखाचे नुकसान

21

मोताळा तालुक्यातील गुळभेली शिवारातील घटना

मोताळा : मोताळा वनपरिक्षेत्र हद्दीतील गुळभेली शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 12 बकऱ्या ठार झाल्याची घटना सोमवार 21 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तालुक्यातील गुळभेली शिवारात गट न.78 मध्ये आत्माराम पंढरी दळवी यांची शेती आहे. त्यांनी शेतात पशुधनासाठी शेतात टीनशेडचा गोठा बांधलेला आहे. 20 एप्रिलच्या रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे गोठ्यामध्ये आपल्या बकऱ्या बांधून घरी गेले होते. दरम्यान 21 एप्रिलच्या सकाळी बिबट्याने टीनशेडच्या गोठ्यात जाळीतून गोठ्यात प्रवेश करीत अचानक हल्ला चढवित 7 बकऱ्या, 3 बोकड, 2 पिल्ले असे एकूण 12 जनावरांचा फडशा पाडला, तर 1 बोकडाचे पिल्लू जखमी केल्याने दळवी यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. मोताळा वनविभागाचे वनपाल एस.एच.जगताप व वनरक्षक आर.बी.शिरसाट तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिक कोकाटे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

खैरा येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
नांदुरा तालुक्यातील खैरा येथील अनंता महादेव गावंडे (वय 40) हे शेतात 21 एप्रिल रोजी सकाळी पाणी देत असतांना सकाळी 7.15 वाजता त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवित नखोरे ओढले. यावेळी अनंता गावंडे ठिबकचा पाईप फिरवून आरडा-ओरड केल्यामुळे बिबट्या पसार झाल्याने मोठा अनर्थ टळला.

कर्मचारी 6 तासांनी पाहचले घटनास्थळी
वनविभागाचे कर्मचारी हे क्षत्रिय कर्मचाऱ्यांमध्ये मोडतात. ते त्यांच्या बिटच्या मुख्यालयी राहत असल्यामुळे बिबट्याचा हल्ला झाल्याची माहिती मिळताच 1 तासात घटनास्थळी दाखल होणे अभिप्रेत आहे. मात्र, मोताळा वनपरिक्षेत्र विभागाचे कर्मचारी घटना घडल्याच्या सहा तासांनी घटनास्थळी पोहचल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.