बुलढाणा- मृत्यू हा अटळ आहे. मात्र, कोणाचा मृत्यू केंव्हा आणि कसा होईल, हे सांगता येत नाही. अशीच एक घटना बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट येथे आज मंगळवार 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता घडली. आगेमोहळाच्या मदमाशा चावल्याने 65 वर्षीय शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू झाला. मृतक शेतकऱ्याचे नाव सोहम सुरोशे असे आहे.
प्राप्त माहितीनुसार पळसखेड भट येथील शेतकरी सोहम ज्ञानदेव सुरोशे (वय 65) हे शेतात काम करीत होते. दरम्यान त्यांच्यावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास आगेमोहाळांच्या मदमाशांनी अचानक हल्ला चढविला. त्यांना प्रचंड प्रमाणात मदमाशा चावल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 2 मुली, सूना, नातवंडे, असा बराच मोठा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सुरोशे कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच रायपूर येथील 50 वर्षीय ग्यानदेव सोनुने यांच्यावर 8 दिवसापुर्वी मदमाशांनी हल्ला चढविला होता, मात्र त्यांना वेळीच हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केल्याने त्यांची तब्येत चांगली आहे.


























