तळणी: (गणेश वाघ) ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या(ZP SCHOOL) जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण व्हावे आणि तेथील विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लागावा, या उदात्त हेतूने ‘सर्विंग रेंजर फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेने मोताळा तालुक्यात मदतीचा हात पुढे केला आहे. या मोहिमेचा शुभारंभ म्हणून तळणी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आणि जनता कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सध्या जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या ही चिंतेची बाब ठरत आहे. ग्रामीण भागातील पालकांचा जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास पुन्हा दृढ व्हावा आणि येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्विंग रेंजर फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाची मुहूर्तमेढ दाभाडी येथील वसंत पंढरी तळोले यांच्या मार्गदर्शनाखाली रोवण्यात आली. किशोर पाटील, किरण बोरकर, रवींद्र चोपडे आणि ज्ञानदेव टेकाळे यांच्यात झालेल्या सविस्तर चर्चेतून, तालुक्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाला सर्विंग रेंजर फाउंडेशनचे वसंत तळोले, किरण बोरकर, किशोर पाटील, रवींद्र चोपडे, ज्ञानदेव टेकाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिकेत बऱ्हाटे, तसेच संदीप झोपे, शरद झोपे, पत्रकार गणेश वाघ (Ganesh Wagh) यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्विंग रेंजर फाउंडेशनने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आणि ग्रामीण शिक्षणाप्रती दाखवलेल्या संवेदनशीलतेचे संपूर्ण मोताळा तालुक्यातून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे शाळांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप
तळणी (Talani) येथील शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि इतर आवश्यक शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हक्काचे शैक्षणिक साहित्य हातात मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा या आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा मुख्य आधार आहेत. या शाळा केवळ टिकवून चालणार नाही, तर त्या अधिक सक्षम करणे काळाची गरज आहे. सध्या आम्ही प्रायोगिक तत्त्वावर साहित्य वाटप केले आहे, मात्र भविष्यात शाळांच्या गरजेनुसार गणवेश आणि अद्ययावत शैक्षणिक साधने पुरवण्यासाठी आमची संस्था कटिबद्ध असल्याचे किरण बोरकर (Kiran Borkar) यांनी सांगितले.


























