विधवा परिषद ठरली एकल महिलांसाठी सन्मान चळवळ
बुलढाणा: वडील गेल्या नंतर वैधव्य झेलत मुलांचे संगोपन करणे सोपी गोष्ट नाही.मुलांना लहानाचे मोठे करतांना आईची खरी कसोटी लागते, असे प्रतिपादन मेहकरचे एसडीओ प्रशांत सानप यांनी केले. तर एकल महिलांच्या हक्काचा लढा अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रा.डी.एस.लहाने म्हणाले.
हिवरा आश्रम (Hiwara Ashram)येथे विधवा व एकल महिला परिषद 31 मार्च रोजी पार पडली, त्यावेळी मान्यवर बोलत होते.अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्षा अशोकराव थोरहाते हे होते. कार्यक्रमास मेहकर एसडीओ प्रशांत सानप, मुख्याधिकारी रामराजे कापरे, आश्रमाचे सचिव अशोकराव गोरे, पंढरीनाथ शेळके, मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस लहाने, प्रा. शाहीणाताई पठाण आदी उपस्थित होते. एकल व विधवा महिला सन्मान चळवळ प्रा. डी एस लहाने यांच्या संकल्पनेत बुलढाण्यात सुरू झाली. विधवा व एकल महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांना समाजामध्ये सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. हिवराआश्रम येथे याच उद्देशाने एकल महिला व विधवा परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित परिचय मेळाव्यात अनेक विधवा महिला व विवाह इच्छूक तरुणांनी सहभाग नोंदविला. यावेळी तरुण तरुणींचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी 12 वाजता सावित्रीबाई फुले,शुकदास महाराज (Shukdas Maharaj)यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक व भूमिका प्रा. डी. एस लहाने यांनी विषद केली. महिला सन्मान चळवळ अधिक व्यापक करणे, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविणे, त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करणे आदि कामे मानस फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असल्याचे लहाने म्हणाले, शुकदास महाराज यांनी परिवर्तनच सांगितले आहे. हिवरा आश्रम मध्ये एकल महिलांना रोजगार दिल्या जातो, तो यापुढे दिल्या जाईल, त्यांच्या आयुष्यातून विधवा किंवा गंगाभागीरथी शब्द कायमचे नष्ट व्हावे असे संतोष गोरे म्हणाले. वेगळ्याच प्रश्नावर आयोजित आजची विधवा परिषद ही परिवर्तनाची नांदी असून या महिलांच्या समस्या किती गंभीर असू शकतात याची जाणीव करून देणारा आजचा कार्यक्रम असल्याचे मुख्याधिकारी रामराजे कापरे म्हणाले. तर अध्यक्षीय भाषणात थोरात यांनी प्रभावीपणे आपले विचार व्यक्त केले. यावेळी अनेक व्यक्तींनी आपली मते मांडली तर विधवा व एकल महिलांनी आपापल्या समस्या मांडल्या. यानंतर परिचय मेळावा पार पडला. सूत्रसंचालन प्राचार्य शाहीनाताई पठाण यांनी तर आभार प्रदर्शन संदीप जाधव यांनी केले. या कार्यक्रमास फाउंडेशनचे गजानन मुळे, दिनकर पांडे, पंजाबराव गवळी, जाधव काका, निलेश गाडेकर, प्रज्ञाताई लांजेवार ,अनिताताई कापरे यांच्यासह हिवरा आश्रमच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


























