~बुलढाणा जिल्ह्यातील 15 आमदारांना मिळते पेन्शन
~संचेती यांना सर्वाधीक 90 तर भारत बोंद्रे यांना 82 हजार !
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (1.May.2023) खरंच अनेकांना आमदार होण्याचे स्वप्न पडतात, ते प्रत्यक्षात सुध्दा उतरुन त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होतात. तर कित्येकांचे करोडो रुपये खर्च होवून देखील आमदार होण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. शेवटी काय? पैसा असून उपयोग नाही, त्याला ‘जनमता’ची सोबत पाहिजे. संकेतस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यात सध्या 15आमदार निवृत्तीवेतन घेतात. त्यामध्ये 4 आमदार 70 हजार रुपये, 4 आमदार 60 हजार तर 4 आमदार 50 हजार व एका आमदाराला 52 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. एकदा आमदार म्हणून शपथ घेतली की मग तुमची कितीही वर्षाचा कालावधी असो, तो संपल्यानंतर पहिल्या टर्मसाठी 50 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. म्हणजेच ‘एकदा आमदार झालं की जीवनभर पगार’ मिळतो.
जिल्ह्यात सर्वाधीक 90 हजार रुपये निवृत्तीवेतन चैनसुख संचेती यांना मिळते. तर त्यापाठोपाठ
भारत राजाभाऊ बोंद्रे यांना 82 हजार, सुबोध केशव सावजी 70 हजार, कृष्णराव गणपतराव इंगळे 70 हजार, श्रीमती रेखा पुरुषोत्तम खेडेकर 70 हजार, दिलीपकुमार गोकुलचंद सानंदा 70 हजार, श्रीमती श्रध्दा प्रभाकरराव टापरे 60 हजार, तोताराम तुकाराम कायंदे 60 हजार, नाना निनाजी कोकरे 60 हजार, राहुल सिंध्दीविनायक बोंद्रे 60 हजार, वसंतराव रामदास शिंदे 50 हजार, धृपदराव भगवान सावळे 50 हजार, शशिकांत नरसिंगराव खेडेकर 50 हजार, हषर्वधन वसंतराव सपकाळ 50 हजार तर विधान परिषदेचे दत्तात्रय एकनाथ लंके यांना 52 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते.
आमदारांना मिळतो दरमहा 2 लक्ष 61 हजार रुपये पगार
आमदारांना जानेवारी 2019 पासून सातवेवेतन लागू करण्यात आले आहे. यामुळे विधानसभा व विधान परिषद सदस्यांचे मुळवेतन 1 लाख 82 हजार, महागाई भत्ता 51.016 टक्के (28टक्के प्रमाणे) दुरध्वनी भत्ता दरमहा 8 हजार रुपये, स्टेशनरी व सुविधा भत्ता 10 हजार, संगणक चालक पगार 10 हजार असे एकूण दरमहा वेतन व भत्ते मिळून आमदारांना दर महिन्याला 2 लाख 61 हजार 216 रुपये पगार मिळतो.
स्वीय सहाय्यकासाठी दरमहा 25 हजार
इतर सुविधा विधानसभा किंवा विधानपरिषद आधिवेशन किंवा समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रतिदीन 2 हजार रुपये, स्वीय सहाय्यकासाठी दरमहा 25 हजार, वाहन चालकासाठी 15 हजार रुपये, रेल्व प्रवासासाठी विद्यमान आमदारांना 5 हजार रुपयांचे कुपन मिळतात त्यानुसार त्यांना राज्यात रेल्वेने प्रथम वर्ग किंवा वातानूकुलीत टु किंवा थ्री टिअरने प्रवासाची सुविधा, राज्याबाहेरील 5 हजार रुपये कुपन तसेच पत्नी व अज्ञान मुले किंवा सोबती यांना 30 हजार कि.मी.चा प्रवास राज्य व राज्याबाहेर मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच राज्य परिवहन व बोटीने मोफत प्रवास सुविधा उपलब्ध आहे. मृत्यू पावलेल्या विधी मंडळाच्या माजी सदस्याच्या विधवेस दरमहा 40 हजार रुपये निवृत्त वेतन यासह आदी सुविधा मिळतात.
- (टिप-सदर माहिती ही महाराष्ट्र विधीमंडळ संकेतस्थळाच्या आधारे घेतलेली असून दि.28 एप्रिल 2023 पर्यंत अद्ययावत यादीनुसार मंजूर करण्यात आलेले निवृत्तीवेतन आहे. फोटो सौजन्य-इंटरनेटवरुन)