रोजीरोटीशी गद्दारी; भारत फायनान्सचा कर्मचारी 4 लाख घेवून पळाला !

23

विक्की रोहणकरवर बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल; महिलांनी सावधगिरी बाळगावी !!

मोताळा: नोकरी मिळत नसल्याने अनेक सुशिक्षीत बेरोजगार रोजगारासाठी भटकत आहे. ज्यांना खासगी नोकरी मिळाली. मात्र, अधिक पैसा कमविण्याच्या हव्यासपोटी अनेकजण घोटाळा करुन रोजीरोटीशी गद्दारी करतात. अशीच एक घटना मोताळा तालुक्यात उघडकीस घडली. नांदुरा भारत फायनान्सच्या शाखेतील महाढग विक्की रोहणकर याने महिलांकडून जमा केलेले बचत गटाचे 4 लाख रुपये घेवून पोबारा केला आहे. त्याच्यावर बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भारत फायनन्स नांदुरा शाखेतील व्यवस्थापक संदीप गजानन खंडेराव रा.वाडगाव ता.संग्रामपूर यांनी शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की, त्यांचे भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीची उपशाखा नांदुरा येथे आहे. त्या ठिकाणी विक्की लक्ष्मण रोहणकर आडगाव ता. अकोट जि. अकोला हा नोकरीवर आहे. त्याच्याकडे महिलाकडून आठवड्याचे बचतगटाचे पैसे वसूल करण्याचे काम आहे. त्याने 30 ऑगस्ट रोजी मोताळा तालुक्यातील डिडोळा, अंत्री तसेच बोराखेडी गावातील महिलांकडून गटाच्या हप्त्याचे 4 लाख 6 हजार 633 रुपये जमा केले. जमा केलेले पैसे नांदुरा शाखेत रात्री आठ वाजेपर्यंत भरणे आवश्यक आहे. मात्र विक्की रोहणकर याने शाखेत पैसे न भरता मोबाईल बंद करुन महिलांकडून जमा केलेले पैसे घेवून पोबारा केला. बोराखेडी पोलिसांनी विक्की लक्ष्मण रोहणकर याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 316 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.

महिलांनी हप्ते भरतांना आयकार्डची मागणी करावी

महिलांना अनेक बचत गटाकडून व्यवसायासाठी 30, 40 हजार ते एका लाखापर्यंत कर्ज मिळते. सदर कर्ज आधार व पॅनकार्डवर बँकेच्या खात्यात किंवा रोख दिल्या जाते. कर्ज मिळाल्याने महिला सुध्दा कर्जाची परतफेड ठरलेल्या हप्त्याच्या दिवशी करतात. मात्र, कर्ज वसुली करतांना फायनान्स कंपनीचे काही कर्मचारी ‘अटरन्यांना’ घेवून पैशाची वसूली करतात. आपली फसवणूक होवू नये, यासाठी बचतगटाच्या महिलांनी हप्ते भरतांना त्यांचे आयकार्ड व आधारकार्डची मागणी करुन तो रात्री 9 नंतर कर्जवसुलीसाठी आल्यास त्यांच्या मॅनेजरशी बोलणे करुनच हप्त्याचे पैसे द्यावे.