मोताळ्यात चोरटे सक्रीय ! गोडावून फोडले; ७८ हजाराचे साहित्य लंपास !!

20

मोताळा: चोर कुठे चोरी करतील याचा नेम नाही, चोरट्यांनी मोताळा शहरात ‘ब्रेक के बाद’ आपले नेटवर्क सक्रीय करीत मोताळा पंचायत समितीचे मागील गोडावून फोडून त्यातील ७८ हजार ४६० रुपयांचे बांधकाम साहित्य लंपास केले. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा शहरात अनेक चोरींच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातील काही चोरटे अजुनही बोराखेडी पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. तर काही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांनी पुन्हा एकदा आपले नेटवर्क सक्रीय करीत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, मलकापूर यांनी मोताळा येथील पंचायत समिती कार्यालयामागील गोडावून मध्ये जुने लोखंडी बांधकाम साहित्य व इतर उपयोगी सामान ठेवले होते. सदर गोडावून फोडून ज्ञानेश्वर गुंजकर व राम गायकवाड दोघे रा.भिलवाडा ता.मोताळा यांनी गोडावून मधील जुने ७८ हजार ४६० रुपयांचे साहित्य चोरुन नेल्याच्या बांधकाम उपविभाग मलकापूरचे कर्मचारी रमेश रामदास बोरेकर यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम ३३४, (१),३०५ (१),३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.