2014 मध्ये 29 टक्के मतदान घेऊन काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ झाले होते आमदार !
मोताळा: बुलढाणा विधानसभा मतदार संघातून 2019 पर्यंत जनतेने 13 आमदारांना विधानसभेत पाठविले आहे. प्रत्येक पक्षाचे उमेदवार भरगच्च मतदान घेवून विजयी झाले. मात्र, 2014 ची विधानसभा निवडणूक चुरशीची झाल्याने विजयी टक्केवारी घटल्याने काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ हे सर्वात कमी 28.66 टक्के मतदान विजयी झाले. तर काँग्रेसचे रामसिंग भोंडे यांचे 1972 च्या निवडणुकीतील 52 टक्के मतदानाचे रेकॉर्ड 57 वर्षात कायम असून ते कोणी मोडले नाही, असा या मतदार संघाचा इतिहास आहे.
बुलढाणा विधानसभा मतदार संघावर पुर्वीपासून तशी काँग्रेसचीच पकड होती. 1967 च्या विधानसभा निवडणुकीत घाटावरील काँग्रेसच्या इंदिराबाई रामराव कोटंबकार 18266 मते घेवून विजयी झाल्या होत्या, त्याची टक्केवारी 41.41 टक्के होती. 1967च्या बुलढाणा विधानसभा निवडणुकीत मोताळा तालुक्याचा समावेश झाला होता, त्यावेळी काँग्रेसच्या सुमनबाई शिवाजीराव पाटील यांनी 27 हजार 016 मते घेवून विजयश्री खेचून आणली त्याची टक्केवारी 44.88 टक्के एव्हढी तर 1972 निवडणुकीत काँग्रेसच्या टिकीटावर रामसिंग देवसिंग भोंडे 30 हजार 540 मते घेवून विजयी झाले, त्याची टक्केवारी 52.55 टक्के होती. 1978 मध्ये शिवाजीराव भिकु पाटील हे काँग्रेस आयच्या टिकीटावर 35 हजार 053 मते घेवून विजयी झाले, त्याची टक्केवारी 43.70टक्के होती. 1980च्या निवडणुकीत सखाराम विठोबा अहेर काँग्रेस आयच्या टिकीटावर निवडणूक लढून 33143 मते घेवून विजयी झाले त्याची टक्केवारी 43.49 टक्के होती. 1985 मध्ये काँग्रेसच्या टिकीटावर विठ्ठलराव सोनाजी पाटील निवडणूक लढीत त्यांनी 36277 मते घेतली, त्याची टक्केवारी 43.03 टक्के होती. 1990 मध्ये शिवसेनेच्या टिकीटावर राजेंद्र व्यंकटराव गोडे यांनी निवडणूक लढवित 43244 मते घेतली, त्याची टक्केवारी 39.33 टक्के होती. 1995 मध्ये विजय हरीभाऊ शिंदे हे शिवसेनेच्या टिकीटावर निवडणूक लढले त्यांनी 34.12 टक्के म्हणजे 48842 मते मिळवित विजयश्री खेचून आणली. धृपतराव भगवानराव सावळे यांनी 1999 काँग्रेसच्या टिकीटावर निवडणूक लढवित 42079 मते घेतली, त्याची टक्केवारी 32.98 टक्के होती. 2004 मध्ये विजय हरीभाऊ शिंदे यांनी शिवसेनेच्या टिकीटावर निवडणूक लढवित 55546 मते घेतली. 2009 मध्ये सुध्दा सलग दसऱ्यांदा शिवसेनेच्या टिकीटावर विजय शिंदे यांनी 66524 मते घेतली त्याची टक्केवारी 46.74 टक्के होती. 2014 मध्ये काँग्रेसच्या टिकीटावर हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांनी निवडणूक लढवित 46985 मते मिळवित विजश्री खेचून आणली, त्या मतदानाची टक्केवारी सर्वात कमी 28.66 टक्के एवढी होती. तर 2019च्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या टिकीटावर संजय गायकवाड यांनी निवडणूक लढवित त्यांनी 67785 मते घेवून विजय संपादन केला, त्यांना मिळालेल्या मतदानाची टक्केवारी 37.82 टक्के एवढी होती. आता नोव्हेंबर महिन्यामध्ये होवू घातलेल्या निवडणुकीत बुलढाणा मतदार संघात कोण किती मताने विजयी होतो, 23 नोव्हेंबरला कळेलच. परंतु निवडून येण्याची टक्केवारी 28 टक्क्याच्या खालील राहते की, रामसिंग भोंडे यांचे 52.55 टक्क्याचे रेकॉर्ड कोणी तोडते की, त्यांचा इतिहास विधानसभा मतदार संघात तसाच कायम राहते. हे ही पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
2024 चे आमदार कोण ?
बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये जनतेने नेहमीच परिवर्तन केल्याने दोनवेळा कोणी आमदार झाले नाही. मात्र, शिवसेनेचे विजयराज शिंदे यांना मतदारांनी 2004 व 2009 मध्ये लगातार दोनवेळा विधानसभेत पाठविले. आता 2024 मध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या नावातही ‘जय’ तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार जयश्री सुनिल शेळके यांच्यामध्ये लढत होणार असून त्यांच्या नावातही ‘जय’ असल्याने कोण विजयश्री खेचून आणते, हे 23 नोव्हेंबरला क्लिअर होईल, मात्र तोपर्यंत सस्पेंन्स कायम राहणार !
घाटाखालील तीन आमदारांना संधी
बुलढाणा विधानसभा मतदार संघात विजयी उमेदवारांना घाटाखालून लिड मिळतो, असा या मतदार संघाचा सर्वश्रृत इतिहास आहे. असे असून देखील या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची घाटाखालील तीन जणांना संधी मिळाली. यामध्ये एका महिला आमदाराचा समावेश असून सर्वाधिक 10 आमदार हे घाटावरीलच असल्याने 2024 चे आमदार देखील ‘घाटावरचेच’ असतील यामध्ये तिळमात्र शंका नाही, कारण घाटाखालील नेतृत्वाला घाटावरील नेत्यांनी कधी मोठे होवूच दिले नाही, हे विशेष !