वाघजाळ धा.बढे रोडवरील घटना
मोताळा- वन्यप्राणी रोहट्याच्या धडकेत दुचाकीवरील तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवार २० डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाच ते पावनेसहा वाजेच्या सुमारास वाघजाळ ते धा.बढे रोडवर रोहिणखेड शिवारात घडली. यामध्ये दुचाकीस्वार मस्तान शहा मकबूल शहा यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे प्राथमिक उपचार करुन गोदावरी हॉस्पीटल जळगाव खांदेश येथे आज शनिवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 4 वाजेच्या सुमारास शस्त्रक्रीया करण्यात आली. जखमी दोघांवर जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे उपचार सुरु आहेत.
मोताळा तालुक्यातील बाम्हंदा येथील मस्तान शहा मकबुल शहा (वय ५०) हे आपली दुचाकी क्र.एम.एच.२८-एस-५५२६ने श्याम बळीराम राठोड (वय २६) व सुरेश देवराव चव्हाण (वय २७) यांच्यासोबत २० डिसेंबर रोजी मोताळा येथून धा.बढे जात होते. दरम्यान, रोहिणखेड शिवारातील एका वळणावर त्यांच्या दुचाकीला रोहट्याने जबर धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक मस्तान शहा मकबूल शहा यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यांना स्थानिक नागरिकांनी उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन जळगाव खांदेश येथील गोदावरी हॉस्पीटल येथे उचारार्थ दाखल केले. त्यांच्यावर 21 डिसेंबरच्या सकाळी 4 वाजेच्या सुमारास शस्त्रक्रीया करण्यात आली. तर सुरेश चव्हाण यांचा हात मोडलेला असून श्याम राठोड यांना मुक्का मार लागल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे उपचार सुरु आहेत. वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी समोर येत आहे.