मोताळा: आईच्या नावावर असलेल्या शेतीवर काढलेले कर्ज फेडू न शकल्याने तालुक्यातील पुन्हई येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना २७ डिसेंबरच्या सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक शेतकर्याचे नाव उखर्डा शिंदे असे आहे.
पुन्हई येथील उखर्डा सुपडा शिंदे यांच्या आईच्या नावावर गट क्र.६७ मध्ये ३ एकर शेती आहे. आईच्या नावावर असलेल्या शेतीवर आई मरण्यापुर्वी बुलडाणा जिल्हा केद्रींय बँकेकडून ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. यावर्षीची दुष्काळग्रस्त परिस्थीतीमुळे शेतीला लावलेला खर्चही निघाला नसल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत उखर्डा शिंदे यांनी सुडबाभळीच्या झाडाला २६ डिसेंबरच्या रात्री गळफास घेवून आत्महत्या केली. तुकाराम दगडू शिंदे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शिंदे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे.