कामात पारदर्शकता आल्याने जिल्ह्यातील लाचखोरी घटली काय? बुलढाणा जिल्ह्यात ८ सापळे कमी; अमरावती जिल्हा मात्र परिक्षेत्रात अव्वल !!

7

बुलढाणा : शासकीय कामकाजात पारदर्शकता यावी, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अ‍ॅक्शन मोडवर आहे. मात्र, अधिकारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नसल्याने पैशांच्या हव्यासपोटी २०२३ व २०२४ या दोनवर्षात अमरावती परिक्षेत्रामध्ये १५२ लाचखोरावर कारवाई करण्यात आली. मात्र एकाही लाचखोरावर गुन्हा सिध्द झालेला नाही. २०२३ मध्ये ८६ तर २०२४ मध्ये ६६ कारवाया करण्यात आल्याने २० ने घट झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात ८ सापळे कमी झाल्याने लाचखोरी घटली का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२४ मध्ये महावितरण मलकापूर ग्रामीण कनिष्ठ अभियंता आकाश सुरेश क्षीरसागर, वरिष्ठ तंत्रज्ञ महादेव कडु पारधी, नगर परिषद शेगाव कंत्राटी कर्मचारी संदेश भिमराव पोहरकार व स्थापत्य बांधकाम विभाग नगर परिषद कंत्राटी कर्मचारी आकाश सुधाकर भोज, उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चिखली प्रभार सिंदखेडराजा किरण केसापूरे, कंत्राटी क्षेत्र पर्यवेक्षक गजानन आबाराव इप्पर, खासगी इसम राजेश तुकाराम जायभाये, पंचायत समिती चिखली समाज कल्याण विभाग कनिष्ठ अभियंता रविंद्र हिंमतराव भंडारे, रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अजित किसनराव करडेल, सिंदखेडराजा तहसिलदार सचिन जैस्वाल, चालक मंगेश शालीग्राम कुलथे, शिपाई पंजाबराव तेजराव ताठे, वनपरिक्षेत्र कार्यालय जळगाव जामोद वनपाल शेख कलीम शेख बिबन, पातुर्डा खु. ता. संग्रामपूर तलाठी पंजाबराव भगवान जाधव, महसूल विभाग बळीराजा ई-सेवा केंद्र नांदूरा संचालक प्रशांत शत्रुघ्न वाकोडे, नांदुरा पंचायत समिती स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक खेमराज नागोराव राठोड, लोणार नगर परिषद कर निरीक्षक अनवरशा कासमशा फकीर अशा ११ कारवाया करण्यात आल्या. अमरावती परिक्षेत्रामध्ये मागील दोन वर्षात १५२ लाचखोरांना पकडण्यात आले असून या एकाही प्रकरणात गुन्हा सिध्द झालेला नाही. बुलढाणा जिल्ह्यात २०२४ मध्ये ११ सापळे लावण्यात आले होते. त्यातील ६ प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. ४ प्रकरणे तपासाधिन, १ प्रकरण अभियोगपूर्व मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून एकही गुन्हा सिध्द झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

भ्रष्टाचारात महसूल विभाग टॉपवर..

भ्रष्टाचारात महसूल विभाग अव्वल असून या विभागातील सर्वाधीक ४ लोकसेवकावर कारवाई करण्यात आली. महावितरण १, वनविभाग १, नगर परिषद २, जिल्हा परिषद ३ अशा कारवाया करण्यात आल्या. ११ प्रकरणात लोकसेवकांनी १ लाख ३६ हजार ३०० रुपयांची लाच स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.

दोन वर्षातील जिल्हानिहाय कारवाई..

अमरावती परिक्षेत्रामध्ये मागीलवर्षी अमरावती जिल्ह्यात २० लाचखोरांना, अकोला १३, यवतमाळ १४, बुलढाणा ११, वाशिम जिल्ह्यात ८ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये २० नी घट झाली असून अमरावती जिल्ह्यात ५, यवतमाळ १, बुलढाणा जिल्हा ८, वाशिम जिल्ह्यात ७ घट झाली असून अकोला जिल्ह्यात मात्र १ कारवाई वाढली आहे.