गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्याची जिल्हास्तरीय कार्यशाळा
बुलढाणा: (शासकीय वार्ता) जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था, संघटना, वैद्यकीय अधिकारी व नागरिकांच्या सहकार्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पीसीपीएनडीटी कार्यक्रमा अंतर्गत पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी तसेच कायद्या अंतर्गत खबऱ्या योजना याबाबत जनजागृती करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयएमए संघटनाचे अध्यक्ष डॉ.अजित सिरसाट, फॉग्सी संघटनाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकिरण पवार,रेडीओलॉलिस्ट संघटनचे अध्यक्ष डॉ.संजय बोथरा, वुमेन्स फोरमचे अध्यक्ष डॉ.माधुरी जवरे, होमियोपॅथी संघटनचे डॉ.दुर्गासिंग जाधव, युनानी संघटनाचे डॉ. शौकत कबिर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पडघान, शाहिना पठाण आदी उपस्थित होते.
डॉ. भुसारी म्हणाले, जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सर्व स्तरातून पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. यासाठी सोनोग्राफी केंद्रांची तपासणी नियमितपणे करावी. तसेच प्रत्येक केंद्रामध्ये पीसीपीएनडीटी कायद्यानुसार बोर्ड, केंद्र नोंदणी प्रमाणपत्र, कलम 9 नुसार गर्भवती महिला नोंदणी रजिस्टर, संमतीपत्र इत्यादी गोष्टींची सोनोग्राफी केंद्रधारक पुर्तता होत आहे किंवा नाही यांची खात्री करावी. गर्भनिदान किंवा कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यास त्याबाबतची माहिती तातडीने उपलब्ध करु द्यावे, असे आवाहन यावेळी केले. सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पडघन म्हणाले की, जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर कमी असून जन्मदर वाढीसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची माहिती यावेळी दिली. महिला सर्वच क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत आहे. त्यामुळे मुलींना कमी न लेखता मुलींच्या जन्माचे स्वागत करा, असे आवाहन डॉ. अजित सिरसाट यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना विधी समुपदेशक Adv. वंदना काकडे यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा रुग्णालयाचे साहेबराव सोळंके यांनी तर आभार ज्ञानेश्वर मुळे यांनी मानले.