शेतकरी भयभीत; सारोळा मारोती शिवारातील घटना
मोताळा : मोताळा वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्याचे हल्ले सतत वाढत असल्यामुळे ‘त्या’ बिबट्यापुढे वनविभागाचे अधिकारी सुध्दा हतबल झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आह. बिबट्याने असाच एक हल्ला सारोळा मारोती शिवारात 6 एप्रिलच्या रात्री केला. यामध्ये 7 बकऱ्या फस्त केल्या तर दोन पिल्लांना घेवून गेल्याने शेतकऱ्याचे 80 हजाराचे नुकसान झाले आहे.
भरत हरी सुराशे यांची सारोळा मारोती शिवारात गट क्र.117 शेती आहे. सुराशे यांनी आपल्या शेतामध्ये बकऱ्यांसाठी टिनशेड बांधले असून ते त्यामध्ये बकऱ्या बांधून ठेवतात. नेहमीप्रमाणे ते 6 एप्रिलच्या सायंकाळी बकऱ्यांना चारा टाकून घरी निघून गेले. दरम्यान, रात्रीच्या 12 वाजेच्या सुमारास बिबट्याने टिनशेडमध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर तारेच्या जाळीत घुसून अचानक हल्ला चढवित 5 बकऱ्या फस्त केल्या. एका बकरीला जखमी केले. तर दोन बकरीचे पिल्ले मारुन सोबत घेवून गेल्याने सुरोशे यांचे अंदाजे 80 हजाराचे नुकसान झाले. भरत सुराशे आज सोमवार 7 एप्रिल रोजी सकाळी शेतात गेले असतांना त्यांना सदर परिस्थीती दिसून आली. सदर घटनेची माहिती मिळताच मोताळा वनविभागाचे रोहिणखेड बीटचे वनपाल एस.एच.जगताप, वनरक्षक आर.बी.शिरसाट घटनास्थळी पोहचले यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी प्रदीप कोकाटे हे घटनास्थळी उपस्थित होते.
वनविभाग हतबल काय करावे सुचेना
- जानेवारी ते मार्च व एप्रिल या कालवधीमध्ये बिबट्याने 13 बकऱ्यांचा फडशा पाडला. बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही, त्याने 3 कुत्रे सुध्दा मारले आहे. रोहिणखेड शिवारात माणसावर देखील हल्ले चढवित बिबट्याने त्यांना देखील जखमी केले आहे. बिबट्याचे हल्ले वाढल्याने वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी हतबल झाले, त्यांना काय करावे हे सूचत नाही, हे विशेष !