चोरट्यांना पकडण्याचे धा.बढे पोलिसांसमोर मोठे आव्हान
मोताळा- चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत मोताळा तालुक्यातील धा.बढे पोलिस स्टेशन हद्दीकडे आपला मोर्चा वळवित कोऱ्हाळा बाजार येथील बंद घराला टारगेट केले. घरातील 5 लाख 12 हजार 850 रुपयांचा माल लुटून नेला. सदर घटना 6 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
कारंजा लाड येथील ऋषभ भिमकचंद बोहरा धा.बढे पोलिसात फिर्याद दिली, त्यांचे मामा सुभाष जैन रा.कोऱ्हाळा बाजार यांना जळगाव खांदेश येथे उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप डुप्लीकेट चाबीचा वापर करुन उघडून आतमध्ये प्रवेश करीत लाकडी कपाटात ठेवलेले रोख 60 हजार, तसेच सोन्याच्या पाटल्या ४ लाख 3 हजार, सोन्याची राखी २,३५० रुपये, नाकातील नथनी 8 हजार, दोन सोन्याच्या अंगठ्या ३५ हजार, चांदीचे ४ शिक्के 1500 रुपये आणि चांदीच्या पायातील दोन जुन्या चैनपट्या 3 हजार रुपये असा एकूण ५ लाख १२ हजार ८५० रुपयांचा माल लंपास केल्याच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2003 कलम 305 (a) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांना पकडण्याचे धा.बढे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. तपास पीएसआय. राहुल वरारकर करीत आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाल्याची माहिती ठाणेदार नागेश जायले पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.