घातपात, विषप्रयोग की? नैसर्गिक मृत्यू; अहवालाअंती सत्य समोर येईल !!
बुलढाणा: मोताळा वनविभागाच्या रोहिणखेड बिटमधील सारोळापीर शिवारात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याची घटना आज 5 डिसेंबर रोजी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. बिबट्याचा नैसर्गीक मृत्यू की, घातपात? हे मात्र बिबट्याच्या पोस्टमार्टम अहवालानंतर समोर येईल. बिबट्याचा मृत्यू 12 ते 20 तासापुर्वी झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
मोताळा वनपरिक्षेत्राअंतर्गत असलेल्या पुन्हई, काबरखेड शिवार, गुळभेली यासह परिसरात बिबट्याने गुरांच्या गोठ्यावर हल्ला चढवित गुरे-ढोरे, बकऱ्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर टाकळी, मुर्ती, पुन्हई, वडगाव, वाघजाळ, परडा, रोहिणखेड शिवारात अनेकांना बिबट्यांचे दर्शन झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. त्यातच आज शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सारोळपीर शिवार गट क्र. 85 मध्ये केशरबाई शांताराम गवळी यांच्या मक्क्याच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. घटनेचे गांभीर्य पाहता माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक अश्वीनी आपेट, मोताळा प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे, वनरक्षक सिरसाठ, वनपाल नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
पशुवैद्यकीय अधिकारी प्रतिक कोकाटे यांनी बिबट्याचे पोस्टमार्टम करुन अहवाल नागपूर फॉरेन्सीक लॅबला पाठविला आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक सुरेश गवस व सहाय्यक अश्वीनी आपेट यांच्या मार्गदर्शनखाली वनक्षेत्रपाल काळे करीत असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.



























