तळणी येथे भितीचे वातावरण; बिबट्याने पाडला बोकड्याचा फडशा

8

शेतकऱ्याचे 10 हजाराचे नुकसान; दोन ते तिन बिबटे असल्याची चर्चा

मोताळा- मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसह नागरिकांना पडला आहे. कारण बिबट्यांचे हल्ले दिवसेंनदिवस वाढत आहे. आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी बिबट्याने तळणी येथील हनुमान नगरापासून दीड ते 2 कि.मी.अंतरावर असलेल्या शेतशिवारात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बोकड्यावर हल्ला चढवित त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली. त्यामुळे तळणीसह परिसरात शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

तळणी गावातील हनुमान नगर येथील कुसुमबाई पांडुरंग तायडे व गजानन बावस्कार हे तळणी शिवारात बकऱ्या चारत होत्या. दरम्यान आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने कुसुमबाई तायडे यांच्या बोकड्यावर हल्ला चढवित त्याचा फडशा पाडला. बोकड्याला बिबट्या ओढत नेत असतांना कुसुमबाई व गजानन यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने पळ काढला. मात्र, बोकड तोपर्यंत मृत्यूमुखी पडला होता. यामुळे कुसुमबाई यांचे 10 हजाराचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असून शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याकडे मोताळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून सदर हिस्त्रप्राणी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुपालक शेतकर्‍यांकडून होत आहे.

बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले

मोताळा वनपरिक्षेत्रात बिबट्यांची संख्या दिवसेंनदिवस मोठ्या झपाट्याने वाढत आहे का? कारण बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. एक बिबट सारोळापीर परिसरात मृत अवस्थेत आढळून आला होता. तळणी परिसरात 2 ते 3 बिबट्या असल्याची गावात चर्चा असल्याने बिबटे जंगल सोडून शेतशिवार परिसरात का येतात? याचे वनविभागाने कारण शोधून उपायोजना करणे गरजेचे आहे.