मुक्ताईनगर: (गणेश वाघ)बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, मलकापूर आणि मोताळा या तीन तालुक्यांमध्ये गेल्या काही काळापासून पशुधन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालक प्रचंड दहशतीत आहेत. या गंभीर विषयावर आ.एकनाथराव खडसे यांनी विधान परिषद सभागृहात तारांकित प्रश्नाद्वारे सरकारचे लक्ष वेधले. पशुधन चोरीच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने काय पावले उचलली आणि दोषींवर कठोर कारवाई कधी होणार, असा सवालच नाथाभाऊंनी यावेळी उपस्थित केला.
आ.नाथाभाऊंनी सभागृहात माहितीच दिली, जानेवारी २०२६ मध्ये लोकप्रतिनिधींनी या चोरीच्या सत्राबाबत अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, बुलढाणा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली होती. शेतकऱ्यांचे आर्थिक कणा असलेले पशुधन चोरीला जाणे ही अत्यंत चिंतेची बाब असून, यामागे एखादी मोठी आंतरजिल्हा टोळी सक्रिय असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. गेल्या तीन वर्षांत या तालुक्यांमध्ये दाखल झालेले गुन्हे, अटक केलेले आरोपी आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल याची माहितीच नाथाभाऊंनी सरकारकडे मागितली.
प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची आकडेवारी सादर केली. गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोताळा तालुक्यातील बोराखेडी आणि धामणगाव बढे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण २४ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांत ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मलकापूर शहर, ग्रामीण आणि एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत १७ गुन्हे दाखल असून ८ आरोपींना अटक तर १० आरोपींना सूचनापत्र देण्यात आले आहे. येथे ६ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत १३ गुन्हे दाखल असून ३ आरोपींना अटक व ८ जणांना नोटीस बजावण्यात आली असून १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नांदुरा, मलकापूर तालुक्यात आंतरजिल्हा टोळी
आंतरजिल्हा टोळ्यांच्या संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नांदुरा आणि मलकापूर येथे आंतरजिल्हा पशुधन चोरीप्रकरणी ३ गुन्हे दाखल असून या प्रकरणी ५ आरोपी अटकेत असून १ आरोपीस सूचनापत्रावर सोडले आहे तर २ आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यसुत्रधारांवर व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
आमदार एकनाथराव खडसे यांनी या मुद्द्यावर केवळ गुन्हे दाखल करून भागणार नाही, तर या चोऱ्यांमागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा आणि संबंधित व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पोलीस गस्त वाढवणे आणि चोरीला गेलेले पशुधन लवकरात लवकर परत मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील पशुधन चोरीचा प्रश्न आता राज्याच्या पटलावर आला आहे.


























