BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (17 Feb. 2023) छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्राची सांगड घातल्याने ते यशस्वी होऊ शकले. आज त्या प्राचीन शस्त्रांची गरज नाही ती जागा शास्त्राने म्हणजेच लेखणीने घेतली आहे. त्यामुळे आजचे शस्त्र व शास्त्र विचारात घेऊन वाटचाल झाल्यास यशश्री खेचता येईल, असे प्रतिपादन लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी केले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शस्त्र प्रदर्शनीचे उद्घाटन आज 17 फेब्रुवारी रोजी जिजामाता क्रीडा संकूल परिसरात करण्यात आले. चिलखत, भाला ,तलवार ,ढाल, खंडा तलवार, दांडपट्टा, तोप गोळा ,बिचवे ,कट्यार, वाघनखे,खंजीर, आदी जुन्या शिवकालीन -प्राचीन शस्त्रांचे दर्शन या निमित्ताने बुलढाणाकरांना झाले. पुढे बोलताना शिवाजीराजे म्हणाले, केवळ शस्त्र पारंगत होऊन चालत नाही तर शास्त्राची जोड ही असावी लागते. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र दोन्ही पारंगत केले. ग्रंथांची त्यांना चांगली जाण होती. अनेक भाषा अवगत होत्या. चौफेर ज्ञान असल्याने महाराज आधुनिक वागू शकले. आधुनिकता स्वीकारण्यासाठी चौफेर ज्ञान अत्यंत गरजेचे आहे. स्वराज्याला त्याचा मोठा हातभार लागला. आज तलवार ऐवजी पेन आपल्या हाती आहे. तो निपुणतेने चालवणे, सखोल ज्ञान संपादन करणे म्हणजेच शिवकार्य असे शिवाजी राजे म्हणाले. या कार्यक्रमात शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर चिंचोले, सचिव सुनील सपकाळ, माजी अध्यक्ष रंजीतसिंग राजपूत, जयसिंग राजे देशमुख ,मृत्युंजय गायकवाड, प्राध्यापक अनिल रिंढे,,प्राध्यापक शाहीनाताई पठाण, विजयाताई काकडे ,पत्रकार गणेश निकम, अनिता कापरे, प्राचार्य ज्योती पाटील, प्रा. जगदेवराव बाहेकर प्रा. पठाणसर, वैशाली ठाकरे, दामोदर बिडवे, राजेंद्र धोंडगे, प्राचार्य सुनील जवंजाळ शिवश्री संजय खांडवे,अंजली परांजपे, आदींनी सहभाग घेतला.
- शाळा-कॉलेजचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
अनेक शाळा-कॉलेजचे विद्यार्थी शाळांचे विद्यार्थी शस्त्र प्रदर्शनी पाहण्यासाठी आल्याने कार्यक्रमास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वायाळ, मनोहर धंदर यांच्यासह ठाणेदार प्रल्हाद काटकर आदींनी भेटी दिल्या. ग्रामीण व शहरी भागातील अनेक शाळांनी शस्त्र प्रदर्शनीसाठी विद्यार्थी आणले होते. - पेन हेच आजचे शस्त्र- आ.संजय गायकवाड
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले हे करीत असताना त्यांनी कठोर परिश्रम घेतले. परिश्रम घेण्याची तयारी ठेवून कार्य करणे म्हणजे शिवकार्य असल्याचे प्रतिपादन आ.संजय गायकवाड यांनी केले. महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर वेगवेगळी क्षेत्र ताब्यात घेणे हे महत्त्वाचे आहे. पेन व संगणक आजचे प्रभावी शस्त्र आहेत, असेही यावेळी आ.गायकवाड म्हणाले.