खामखेड येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

84

मोताळा(20 OCT. 2023) सततची नापिकी व वाढत्या कर्जबाजारीला कंटाळून एका 38 वर्षीय युवा शेतकऱ्याने विषारी औषधी प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. सदर दुदैवी घटना 19 ऑक्टोबर रोजी मोताळा तालुक्यातील खामखेड येथे घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव संदीप गावंडे असे आहे.

खामखेड येथील युवा शेतकरी संदीप सुभाष गावंडे (वय 38) यांच्याकडे खामखेड शिवारात गट नं.8 मध्ये शेती आहे. मागील दोन वर्षाची सततची नापीकी, शेतीला लावलेला खर्च न निघाल्याने बँकेच्या कर्जाचा वाढता डोंगर, त्यातच कुटुंबीयांचे पालन पोषण कसे करावे, या विवंचनेत संदीप गावंडे यांनी 19 ऑक्टोबर रोजी कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी विषारी औषधी प्राशन केले. त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याकडे अडीच एकर शेती असून त्यांच्यावर रोहिणखेड येथील महाराष्ट्र बँकेचे 2 लाखाचे कर्ज होते. बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले असा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गावंडे कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.