प्रेम एक ईश्वरी देणगी आहे…

63

‘व्हॅलेंटाईन डे’स्पेशल!

सखे, तुला वाटेल कसा हा चावटपणा, कसा हा मला प्रेमपत्र लिहतो, प्रेम एवढं स्वस्त अन् शब्दात व्यक्त करणारं आहे का? प्रेम हे फक्त प्रेमिका आणि प्रेमी यांचीच जहागीरदारी आहे का? नक्कीच नाही. प्रेम हे एक ईश्वरीय देणगी आहे. मग ते प्रेम हे बहिण-भावाचे, आई-वडीलांचे, ईश्वर आणि भक्ताचे असू शकते. प्रेमपत्र कुणीही कुणाला लिहू शकतात जे एकमेकांवर प्रेम करतात. आता हे प्रेमपत्र असल्यामुळे इतर भानगडीत न पडता प्रेमाविषयी लिहतो, आशा आहे तू प्रेमाने वाचून समजून घेशील.

प्रेमाविषयी संत कबीर म्हणतात..
पोथी पढी पढी जग मुआ,पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का,पढ़े सो पंडित होय।

सखे,मोठी-मोठी पुस्तके वाचून सुध्दा कित्येक लोक मृत्यूच्या दारात पोहचतात, ते सर्व विद्वान होवू शकत नाही. कबीर, म्हणतात प्रेमाचे दिड अक्षरे वाचून वास्तविक जीवनात त्याचा अर्थ जाणून घेतात तेच खरे ज्ञानी आहेत. ‘प्रेम’ हा अडीच अक्षरी शब्द कानावर पडताच चेहऱ्यावरील भाव अचानक बदलतात. अचानक चेहऱ्यावर एक अनोळखी भाव आणि डोळ्यात पाहणाऱ्याला एक अनोळखी चमक दिसू लागते, त्यावेळी हृदयाचे स्पंदने वाढू लागतात अन् चेहराही आनंदी होवून मनातल्या मनात हसल्याने त्याची खळी गालावर दिसू लागल्याचा भास होतो. प्रेमाच्या कथा सर्वांना ऐकायला व ऐकवायला आवडतात. पण प्रेम म्हणजे नक्की काय असतं? हे मोठ-मोठ्या विद्वानांना सांगता येत नाही. प्रत्येकाचा प्रेमात अनूभव वेगवेगळा असतो. जसी एखाद्या वस्तूची चव आपण डोळ्याने पाहून सांगू शकत नाही, तीच्या चवीचे वर्णन करण्यासाठी तीला प्रत्यक्ष चाखून पहावं लागते, तसे प्रेमाचे आहे. प्रेमाची चव चाखून पाहण्यासाठी प्रेमातं पडावं लागते.

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असते, असे म्हटले जाते. ते प्रेम, हे निर्भीड निस्वार्थी असावं, प्रेमामध्ये घेण्यापेक्षा देण्याला जास्त महत्वं असावं, प्रेमात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ, उच-नीच असा भेदभाव नसतो. म्हणूनच निस्वार्थी ईश्वरभक्ती प्रेमामुळे संत जनाबाई विठूरायाला म्हणते..

धरीला पंढरीचा चोर,गळा बांधुनीया दोर।
हृदय बंदिखाना केला,आंत विठ्ठल कोंडीला।।

परमेश्वर भेटीसाठी आतूर झालेली जनाबाई ज्यावेळी आपलं आर्त पुरवण्याचं सार्थ स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी शिष्टाचाराने सारे संकेत पार उखडून टाकते. भौतिकातील सर्व व्यवहार सोडून स्वबळावर आत्मविश्वासानं आत्मनिर्भर होऊन विठ्ठलाकडे निघालेली जनाई इथं दिसते. तिच्या अंतरीची पराकोटीची विठ्ठल भेटीचे भक्तीप्रेमच तिला आत्मलक्ष्मी बनवते. आणि त्या प्रेमापोटीच ती विठ्ठलाला प्रेम जिव्हाळ्यानं हृदयात बंदिस्त करून ठेवते.

सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला।
जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुजला..।।

अध्यात्मातील ‘सोहम’ या महावाक्याच्या साह्यानं ती विठ्ठलाला चांगलच कोंडीत पकडते. हे संत जनाबाईचं पांडुरंगावर असलेलं भक्तीरुप प्रेम आहे, प्रेम हे अनमोल आहे. प्रेमात संपूर्ण जग बदल्याची क्षमता आहे. त्या प्रेमाकडे डोळसपणे पाहूच शकत नाही, म्हणून तर म्हणतात माणूस प्रेमात पडला की आंधळा होतो ते खरं आहे. काही लोक अस्तीत्व नसलेल्या प्रेमाला १४ फेब्रुवारी जागतीक प्रेमदिनी सोशल मिडीया व प्रत्यक्ष प्रेमपत्र, गुलाब व काही तर महागडी वस्तू भेट देवून प्रेम व्यक्त करतात, ते प्रेम खरं आहे का? आजचे मुले-मुली फेसबूक सारख्या सोशल साईट्सच्या प्रेमात आंधळ्या झालेल्यांना बळ देतात, आपलं खरं प्रेम शोधायला असा एक मोठा गैरसमज समाजात मोठ्या प्रमाणत वाढत आहे. हे प्रेम किती दिवस टिकेल, हा ही एक अनाकलनीय प्रश्नच आहे.

आज एकतर्फी प्रेमातून साध्या-भोळ्या निरागस तरुणीवर जीवघेणे हल्ले होतात ते हल्ले करणारे खरे प्रेमी असतात की प्रेमाला बदनाम करणारे मुर्ख, याचे आत्मपरीक्षण व्हॉट्सअ‍ॅप, व्टिट्र, पेâसबुकच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करणाऱ्या तरुण-तरुणींनी करणे जरुरी आहे. आपण प्रेमात पडावं अशी एकच व्यक्ती या जगात आहे, असा विचार करणं हाच सर्वात मोठा गाढवपणा आहे. तीनं दुसऱ्याशी संसार थाटल्याने तिला संपविल्याचे छातीठोकपणे सांगणाऱ्या मुर्खांची संख्या सुध्दा कमी नाही. जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीला संपविणे यातच खरं प्रेम आहे काय? नक्कीच नाही.

सखे, प्रत्येकाला मन आहे, भावना आहे आणि त्या व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार सुध्दा आहे. प्रत्येकाने आपले प्रेम, भावना वेळेत व्यक्त कराव्या, अन्यथा त्या मनात राहून मन गढूळ होते. खरं प्रेम व्यक्त करायला वेळ लावू नये; कारण येणारा काळ अन् जाणारा वेळ कुणीही थांबवून ठेवू शकत नाही. प्रेमाविषयी कवी कुसुमाग्रज म्हणतात, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वणवा होवून जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं.. प्रेम कर, भिल्लांसारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुध्दा मेघापर्यंत पोहोचलेलं..उधळून दे तुफान सारं मनामधे साचलेलं, प्रेम कर भिलांसारखं बाणावरती खोचलेलं.. प्रेम ही अखंड वाहणारी अमृत सरीता आहे.या प्रेमाचा स्पर्श ज्यांना झाला त्यांचे जीवन अमृतमय होवून जाते. प्रेम असावं.. निर्भीड, निस्वार्थी, निस्मीम राधेचे श्रीकृष्णावर, संताच ईश्वरावर, ‘मिरा’चं मुरलीधरावर, भिल्लांसारखं बाणावरती खोचलेलं !

-संजय शिराळ
प्रभाग क्र.9 मोताळा मो.८२०८७२४२५८