मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई केंव्हा?
मोताळा- मकरसंक्रांत येण्याआधीच मोताळा शहरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी सुरु झाली आहे. अनेक मुले पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधीत नायलॉन मांजाचा वापर करतात. नायलॉन मांजा गळ्याला घासल्याने दुचाकीस्वार अशोक झंवर यांचा गळा कापल्या गेल्याने ते दुचाकीवरुन खाली पडल्याने जखमी झाले. त्यांच्या गळ्याला 5 टाके पडले सदर घटना मोताळा-बुलढाणा रोडवरील जवाहर उर्दु हायस्कूलजवळ घडली. दुचाकीचा वेग कमी असल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मोताळा येथील 63 वर्षीय माजी सरपंच अशोक नंदलाल झंवर हे आपल्या दुचाकीने शेतात जाण्यासाठी चिंचपूरकडे निघाले होते. दरम्यान, मलकापूर रोडवरील लोखंडी पुलाजवळील जवाहर उर्दु हायस्कूल जवळ त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते खाली पडले. मांजाने त्यांचा गळा चिरला गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. त्यांच्यावर बुलढाणा येथील छाजेड हॉस्पीटल मध्ये उपचार करण्यात आले. गळ्याला 5 टाके पडले असून हाता-पायाला सुध्दा दुखापत झाली आहे. नायलॉन मांजा अडकल्याने दुखापत झाल्याच्या घटना यापुर्वी घडलेल्या आहेत. मांजा विकणाऱ्यांवर पोलिस प्रशासन व नगर पंचायत प्रशासनाने संयुक्तीरीत्या कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बंदी असून विकल्या जातो मांजा
नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असून देखील कारवाई केली जात नसल्यामुळे पतंग उडविण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री होत आहे. यामुळे दुचाकीस्वार व शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या गळ्यात मांजा अडकल्याच्या घटना घडत आहे. मोठी दुर्घटना होण्याआधी मांजा विकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
दुचाकी चालकांनी दक्षता घ्यावी
पतंगबाजीसाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा अतिशय घातक ठरत आहे. दरवर्षी नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होतात. कुणाचा हात कापला जातो तर कुणाचा गळा चिरून गंभीर जखम होते. रस्त्यांवर कुठेही नायलॉन मांजा अडकलेला असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालविताना दक्षता घेणे गरजेचे आहे.