अ‍ॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढला नसेलतर काढून घ्या..!

11

..अन्यथा, शासकिय योजनांचा लाभ मिळणार नाही

बुलढाणा: अ‍ॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच निमिर्ती आणि शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी अ‍ॅग्रिस्टॅकअंतर्गत आपला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जावून तात्काळ तयार करुन घ्यावा. फार्मर आयडी नसल्यास शासकिय योजनांचा लाभ मिळणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी प्रकल्पाची अमंलबजावणी जिल्हयात दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून कॅम्प मोडमध्ये तसेच दिनांक 21 जानेवारी 2025 पासुन नागरी सुविधा केंद्र आणि कॅम्प या हायब्रिड मोडव्दारे करण्यात आली आहे. सदर मोहिम अंतर्गत जिल्हयात 14 ऑक्टोबर 2025 अखेर 4,56,810 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पी.एम. किसान योजनेचे एकूण 4,34,468 लाभार्थी आहेत त्यापैकी आजअखेर 3,32,601 लाभार्थ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात आले आहे. तरी उर्वरित 1,01,867 शेतकऱ्यांनी तात्काळ शेतकरी ओळख क्रमांक तयार करुन घ्यावे, अन्यथा आपल्याला पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

जिल्ह्यातील सर्व संयुक्त खातेदार व सामाईक खातेदार यांनी प्रत्येक सहधारकांचा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करुन घ्यावा. या अ‍ॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असून तो असेल तरच शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची (ई-केवायसी) आवश्यकता राहणार नाही. अ‍ॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सातबारा आधारला लिंक करायचा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना एक फार्मर आयडी मिळेल, फार्मर आयडी बनवला नाही तर पीक विमा, पीक कर्ज. पीएम किसान व विविध पीक अनुदान यांचा लाभ मिळणार नाही.

  • फार्मर आयडी तात्काळ काढू घ्या- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील
    29 एप्रिलचे शासन परिपत्रक तसेच 10 ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याचे अ‍ॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होवून अॅग्रिस्टॅकमध्ये ई केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी (डिबीटीव्दारे मदत वितरणासाठी आवश्यक) ईकेवायसी प्रक्रियेपासून सुट देण्यात येत आहे असे निर्देश आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी अ‍ॅग्रिस्टॅकअंतर्गत आपला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जावून तात्काळ तयार करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.