मलकापूर: शहरात चोरट्यांनी पोलिसांपेक्षा आपले नेटवर्क सक्रीय केले आहे. ते पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरींच्या घटनांचा अंजाम देत आहे. चोरट्यांनी गोकुळधाम कॉलनी, मलकापूर येथे राहणाऱ्या एका फायनान्स ब्रँच मॅनेजरच्या घराकडे मोर्चा वळवित लोखंडी अलमारीत ठेवलेले सोन्या-चांदीच्या दागिण्यासह 36 हजार 867 रुपयांचे दागिणे लंपास केल्याची घटना घडल्यास परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिपक तरणगिर गिरी रा.महागांव कसबा ता.दारव्हा जि.यवतमाळ यांनी मलकापूर शहर पोलिसात फिर्याद दिली की, ते गोकुळधाम कॉलनी येथील सुरेश चेतनलाल शर्मा यांच्या घरात कुटुंबीयासह भाड्याने राहतात. ते क्रेडिट अक्सेस ग्रामीन लि.फायन्सस बोदवड जि.जळगाव येथे ब्रँच मॅनेजर म्हणुन खाजगी नोकरी करतात. त्यांची पत्नी व मुले गावाकडे गेले आहे. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते घराच्या मुख्य दरवाज्याला लॉक करुन बोदवड येथे ड्युटीवर गेले होते. ते 18 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठ वाजता घरी आले असता त्यांना मुख्य दरवाज्याचा कोंडा तोडून चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून त्यांच्या लोखंडी कपाटातील सोन्याचे गहुमणी 29 हजार, चांदीचे 10 ग्रॅम जोडवे 867 व नगदी 7 हजार रुपये असा एकूण 36 हजार 867 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे गिरी यांना दिसून आले, अशा फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305, 331(3), 331(4) अन्वये अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.



























