एसटी.चालकाचा निष्काळजीपणा युवकांच्या जीवावर बेतला बसचा पत्रा निघाल्याने दोघांचे हात धडावेगळे तर एकाची प्रकृती गंभीर!

815

मलकापूर ते पिं.देवी रोडवरील घटना;संतप्त जमावाचा मलकापूर आगारात राडा
मोताळा(BNUन्यूज)एसटी. प्रवाशांच्या सेवेसाठी, सुखकर प्रवास एसटीचा प्रवास, असा गाजावाजा केला जातो. परंतु भंगार बसेसमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून याकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. मलकापूर आगाराच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे रोडने चालणाऱ्या तिघांना बसने उडवून दिल्यामुळे दोघांचे हात धडावेगळे झाले तर एकाचा हात फॅक्चर झाला आहे. परमेश्वर सुरडकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव खांदेश येथील सुयोग हॉस्पीटलमध्ये उपारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर दोघांवर मलकापूर येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.

प्राप्त माहितीनुसार आज 16 सप्टेंबर रोजी मलकापूर आगाराची बस क्र.एम एच- 40 एन-9121 ही चालक देवराव भावराव सूर्यवंशी हे सकाळी 5.30 वाजता घेवून निघाले होते. या बसचा चालक साईडचा पत्रा बाहेर निघालेला होता. सदर बस सकाळी 6 वाजता आव्हा गावाजवळ परमेश्वर आनंदा सुरडकर वय 45 रा.आव्हा हे शेतात चालले त्यांना बसने जबर धडक दिली या धडकेमध्ये त्यांचा हात धडावेगळा झाला. तर उऱ्हाजवळ विकास गजानन पांडे 22 वर्ष या युवकाला जबर धडक दिली. यामध्ये विकास पांडे याचा हात सुध्दा धडावेगळा झाला आहे. विकास हा अग्नीवीर भरतीची प्रॅक्टीस करीत होता. पिं.गवळी येथील गणेश शंकर पवार याला सुध्दा बसने धडक दिली. या धडकेमध्ये गणेशचा हात फॅक्चर झाला आहे. परमेश्वर सुरडकर यांच्यावर मलकापूर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले. तर विकास पांडे यांची प्रकृती सुध्दा गंभीर असून त्याच्यावर मलकापूर येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. बस धा.बढे पोस्टे.मध्ये जमा करण्यात आली असून बस चालक देवराव भावराव सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले.

 

  • भंगार बसेस धावतात रोडवर..
    बुलडाणा विभागीय कार्यालय अंतर्गत असलेल्या भंगार बसेस विभागीय नियंत्रक यांच्या दुर्लक्षीत कारभारामुळे रोडवर धावत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो, तर काही बसेच बुलडाणा घाट चढता-चढता जीव सोडून देत असल्याने घाटातच बंद पडतात. एसटी. अपघातास चालक व आगार प्रमुख व विभाग नियंत्रक सुध्दा तेवढेच दोषी आहेत. अपघात झाला म्हणजे त्याचे खापर चालकांवर फोडल्या जाते, परंतु चालकांना सुध्दा अनेक अडचणीचा सामना करीत स्वत:चा जीव धोक्यात घालून बसेस चालवाव्या लागतात,अशी चर्चा चालकवर्गामध्ये आहे.
  • ग्रामस्थांचा मलकापूर आगारात राडा..
    भंगार बसेसबाबत संतप्त ग्रामस्थांनी मलकापूर आगारात धडक देत आगार प्रमुख दराडेंना जाब विचारला. दराडेंच्या उत्तराने ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने त्यांनी मलकापूर आगारात राडा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आगारात धाव घेतली. भंगार बसेस बाबत बुलडाणा न्यूज अपडेटने आगार प्रमुख दराडेंशी संपर्क साधला असता कालच सदर बस दुरुस्ती केल्याचे सांगितले. 15 सप्टेंबर रोजी सदर बस दुरुस्त केली होती, तर प्रकार चालक सुर्यवंशी यांच्या निष्काळजीपणाने घडला, यावर आगार प्रमुख दराडेंनी मोहर मारली आहे.