राज्य शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांसाठी गूड न्यूज! दिवाळी उत्साहात साजरी करा; 21 ऑक्टोबरला होणार पगार!!

299

बुलढाणा(BNU न्यूज) दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. यावर्षी दिवाळी सणाला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. राज्य शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना दिवाळी उत्साहात साजरी करता यावा, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घेवून राज्य शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांचे 21 ऑक्टोबरला पगार होणार आहे, तसा शासन निर्णय सुध्दा जारी करण्यात आला आहे. सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी तसेच निवृतवेतन धारकांना देखील लागू करण्यात आलेल्या आहेत.

दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी २२ ऑक्टोबर पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याउद्देशाने माहे ऑक्टोबर २०२२ चे नोव्हेंबर मध्ये देय होणारे वेतन, निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यासाठी 2055 च्या शासन निर्णयातील परिच्छेद १(८) मधील तरतूद शिथील करुन ऑक्टोबर या महिन्याचे वेतन आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान २१ ऑक्टोबर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी मुंबई वित्तीय नियम , १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्र. ३२८ मधील तरतुदी देखील शिथिल करण्यात आल्या आहेत. वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके त्वरीत कोषागारात सादर करावी लागेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे. दिवाळीपूर्वी राज्य शासकीय कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांना 21 ऑक्टोबरला पगार मिळणार असल्याने सर्वांचे दिवाळी गोड होणार, एव्हढे मात्र निश्चीत!