मोताळ्यातले राजकारण लई भारी! काँग्रेसच्या नगरसेविकेची आ.गायकवाडांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत शिवसेना शिंदे गटात ‘घरवापसी’!!

724

काँग्रेसच्या गटनेत्यांनी दिला 72 तासात लेखी अहवाल सादर करण्याचा अल्टीमेटम!!

मोताळा(BNU)म्हणतात ना, युध्द, राजकारण आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते त्याचाच प्रत्येय मोताळा शहरात आलायं..! काँग्रेसच्या सीटवर निवडून आलेल्या नगर सेविका सौ.सरिता विजय सुरडकर यांनी 17 ऑक्टोबर रोजी आ.संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश घेतला. प्रवेश 17 तारखेला झाला पण काँग्रेसच्या गटनेता श्रीमती पुष्णताई चंपालाल जैन यांनी मात्र आज 18 ऑक्टोबर रोजी पक्ष विरोधी कार्यवाही करीत असल्याबाबतचा ठपका ठेवीत 72 तासाच्या आत लेखी म्हणणे सादर करण्याचा नगर सेविका सौ.सुरडकर यांना अल्टीमेटमच दिला आहे.

आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोताळा येथील माजी नगर सेवक विजय सुरडकर व प्रभाग क्रमांक 15 च्या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सरिता विजय सुरडकर यांनी 17 ऑक्टोबर रोजी बाळासाहेबांची शिवसेना यांच्या शिंदे गटाच्या पक्षात घरवापसी केली. ही घर वापसी आ. संजय गायकवाड यांच्या मातोश्री संपर्क कार्यालय येथे करण्यात आली. मोताळा नगर पंचायतचे माजी नगरसेवक विजय सुरडकर व प्रभाग क्रमांक 15 च्या कांग्रेसच्या विद्यामान नगरसेविका सरिता विजय सुरडकर यांनी काही कारणावरुन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र आमदार संजय गायकवाड यांच्या विकास कामांचा झंझावातास प्रभावित होवून सुरडकर पती-पत्नी या जोडप्याने घरवापसी करण्याचा विचार आ.गायकवाड यांच्याकडे बोलून दाखविल्याने सदर सुरडकर जोडप्याने आ.गायकवाड यांच्या मातोश्री संपर्क कार्यालय येथे भेट घेवून आ. संजय गायकवाड, जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, कुणाल गायकवाड, स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे, ज्ञानेश्वर वाघ आदींच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश घेतला होता.

काय म्हणतात काँग्रेस न.पं.गटनेत्या..
काँग्रेसच्या गटनेत्या श्रीमती पुष्पाताई चंपालाल जैन यांनी 18 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या नगर सेविका सौ.सरिता विजय सुरडकर प्रभाग क्र.15 मोताळा यांना दिलेल्या पत्रात म्हणतात, आपण भारतीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हाताचा पंजा या निशाणीवर सन 2021-22 नगर पंचायत मोताळा निवडणूक लढविली व निवडून आल्यात. काँग्रेस पक्षाच्या नगर सेविका म्हणून विजय प्राप्त केला परंतु लालचेपोटी किेवा अमिषामुळे ज्या चिन्हावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिले, त्या पक्षाशी गद्दारी करुन तुम्ही विरोधी पक्षामध्ये प्रवेश करण्याबाबतची माहिती पक्ष श्रेष्ठींकडे आहे. आपण सदर विषयावर 72 तासाच्या आपले म्हणणे लेखी स्वरुपात गटनेत्या यांच्याकडे सादर करावा, अन्यथा आपल्या विरुध्द पक्षांतर बंदी कायद्यातंर्गत कार्यवाहीस पात्र राहाल असे म्हटले आहे. आता पाहू नगरसेविका सौ.सुरडकर लेखी अहवाल सादर करतात का? लेखी अहवाल सादर न केल्यास सौ.सरिता सुरडकर यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करते! भविष्यात आणखी काही घडामोडी घडतात का? हे ही लवकरच कळेल!