काम केल्याचे प्रमाणपत्र दिल्याने 6 ठेकेदारांना
न.पं.प्रशासनाने बजाविल्या नोटीस !
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (Date.22 Jan.2023) हजार रुपये द्या, दोन हजार रुपये द्या, क्लेम काढण्यासाठी 35, 40 किंवा 50 टक्के द्या! पेटीसाठी पाचशे रुपये द्या, या दलालांच्या गोरखधंद्यामुळे इमारत व बांधकाम कामगारांची संख्या वाढून जिल्हाभरात दलालांचा मोठा सुळसुळाट वाढला आहे. जे इमारत बांधकाम कामगारच नाही, ज्यांच्या हाताने कधी बांधकाम केले नाही, की घरातील मातीची चूल सुध्दा सारवली नाही की सिमेंट विटांचे टोपली उचलली नाहीत. त्यांनी दलालांच्या भरवश्यावर बांधकाम कामगारांचे नोंदणी प्रमाणपत्र मिळून मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्नाचे क्लेम काढून शासनाला लाखोचा चूना लावला आहे. बांधकाम कामगारांची संख्या जास्त वाढल्यामुळे नगर पंचायत मोताळा बांधकाम इंजिनीअर मयूर एकडे यांनी शहरातील 6 ठेकेदारांना नोटीसा बजाविल्या आहेत. त्या कामगारांचे भविष्यात नुतकरणीकरण होईल का? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केल्या जात आहे.
शासनस्तरावरुन विविध योजना राबविण्यात येतात, यासाठी बांधकाम कामगारांसाठी, त्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी विविध योजनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य तसेच बांधकाम करतांना कोणत्याही प्रकारची इजा होवू नये यासाठी कामगांराना एक लोखंडी पेटी देण्यात येते, त्यामध्ये टॉर्च, हेल्मेट, बूट, मच्छरदानी यासह आदी साहित्य देण्यात येते. यासाठी शासनाला प्रत्यक्ष 11 हजार रुपये मोजावे लागतात, प्रत्यक्षात मात्र त्या पेटीची बाजारातील किेंमत 5 हजार रुपये आहे. बांधकाम कामगार वाढल्याने शासनाला करोडो रुपयांचा चूना लागत असून सदर पेट्यांचा ठेका दिलेल्यांना करोडोचा फायदा होत आहे. कामगारांच्या जेवणात सुध्दा निकृष्ट जेवणाचा पुरवठा करुन ते अन्न बांधकामांराच्या माथी मारल्या जात आहे. बांधकाम कामगार होण्यासाठी दलालांसह अधिकाऱ्यांची मोठी साखळी निर्माण झाली आहे. हे खुलेआम संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरु आहे. पेटी व क्लेमच्या नावाखाली अनेक तोतया बांधकाम कामगारांनी शासनाला करोडोचा चूना लावीत असून प्रत्यक्षात मात्र जे खरे कामगार आहेत ते मात्र या योजनेपासून वंचितच आहेत, हे विशेष!
मोताळा शहरात 310 नोंदणीकृत बांधकाम कामगार..
मोताळा शहरात बांधकाम कामगारांची संख्या वाढत असून 310 बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असून त्यामानाने शहरात 1 एप्रिल ते 31 मार्च 2022 पर्यंत केवळ 6 नागरिकांनीच घर बांधकामासाठी परवानगी घेतली आहे. तर 5 जणांनी बांधकामासाठी परवानगी घेतली नाही त्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. एकंदरीत 11 ठिकाणी बांधकाम झाले आहे, त्यावर 310 मजुरांनी काम कसे केले, हे न उलगडणारे अनाकलनीय कोडंच आहे.
6 ठेकेदारांना देण्यात आल्या नोटीस..
बांधकाम कामगारांची संख्या मोताळा शहरात झपाट्याने वाढत असून त्यामानाने 11 ठिकाणी बांधकाम झाले, तर 310 मजुरांनी नोंदणी केली. या बांधकाम कामगारांना कामगारांचे प्रमाणपत्र (काम केल्याचे) दिल्याने मोताळा नगर पंचायत प्रशासनाने 6 ठेकेदारांना नोटीशी बजाविल्या आहेत तर 2 ठेकेदार रडावर होते. परंतु त्यांनी फारच कमी कामगारांना प्रमाणपत्र दिल्याने ते मात्र नोटीशीच्या कचाट्यातून वाचले आहेत.
मोताळा शहरात वर्षभरात झाली 11 बांधकामे..
मोताळा शहरात सन 2022 या वर्षात जवळपास 6 जणांनी नगर पंचायतची परवानगी घेवून बांधकाम केले तर 5 जणांनी अवैधरित्या बांधकाम केले आहे. सुरुवातीला बांधकाम कामगार नोंदणीसाठी 500 रुपये तर नगर पंचायत ठरावानुसार आता नोंदणीसाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.