हरभरा शेतीला पर्याय; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ‘राजमा’ पीकांकडे वाढला कल!

204

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा ( 9 ‍Feb. 2023)उत्तर भारतात घेतले जाणारे ‘राजमा’ पीक आता हरभरा शेतीला पर्याय म्हणून पुढे आले आहे. महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यानंतर विदर्भातील वाशिम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरीही ‘राजमा’ला पसंती दर्शविली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात राजमा पिकाचे क्षेत्र वाढत असून अनेक शेतकरी राजमाची लागवड करीत आहे. केळवद ता. चिखली येथील प्रयोगशील शेतकरी संतोष सुभाषराव गायकवाड यांनी पाच एकर शेतीमध्ये राजमा वाघ्या या वाणाची लागवड केली असून एकरी 8 ते 9 क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हरभरा या पिकापेक्षा कमी खर्च लागतो शिवाय रोगराई पासूनही बचाव होत असल्याने राजमा शेतीचा पर्याय अजमावत असल्याचे शेतकरी सांगतात. उतारा चांगला मिळाला आणि बाजारात भावही समाधानकारक मिळाला तर जिल्ह्यात राजमाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होईल असा अंदाजही उत्पादक शेतकऱ्यांकडून बांधला जात आहे.

हरभरा पिकाला पर्याय म्हणून राजमा पिकाची लागवड केली. पुढील रब्बी हंगामात 10 ते 15 एकर क्षेत्रावर पेरणी करणार आहे. सातारा,बीड या ठिकाणी विक्री होत असल्यामुळे मार्केटची अडचण जाणवत नाही.
-संतोष गायकवाड ,
राजमा उत्पादक शेतकरी, केळवद