‘त्या’ 1 कोटी 37 लक्ष रु.च्या अपहार प्रकरणातील दोघांना 14 फेब्रु.पर्यंत पोलिस कोठडी; 1 मात्र रुग्णालयात!

459

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा ( 7 ‍Feb. 2023) बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी पतसंस्था कोथळी शाखेतील तिघांवर करोडो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मलकापूर रिजनल मॅनेजर सचीन झंवर यांच्या फिर्यादीवरुन 6 फेब्रुवारी रोजी बोराखेडी पोस्टे.ला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांना आज 7 फेब्रुवारी न्यायालयाने 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनाविली असून एकाची तब्येत ठिक नसल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी पतसंस्था कोथळी शाखेत 1 कोटी 37 लक्ष 59 हजार 500 रुपयांचा अपहार झाला होता. याप्रकरणी मलकापूर विभागाचे रिजनल मॅनेजर सचिन झंवर यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला 6 फेब्रुवारी रोजी कोथळी शाखेतील आरोपी सुनिल गांधी, सतीष राठी, मधुकर सावळे यांच्यावर भादंवीचे कलम 409, 420, 465, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली होती, तर सतिष राठी याची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोराखेडी पोलिसांनी सुनिल गांधी व मधुकर सावळे या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ‘व्हॅलेटाईन डे’ पर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत. या अपहार प्रकरणामुळे मोताळा तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मास्टर माईंडच्या चर्चांना उधाण..
एका मोठ्या गावात असलेल्या शाखेत कर्मचारी करोडो रुपयांचा अपहार करतात. त्या कर्मचाऱ्यांची एवढी मोठी हिंमत होती का? की त्यांचा पाठीमागे दुसरा कोण मास्टरमाईंड आहे, अश्या चर्चांना मोताळा तालुक्यात उधाण आले असून त्या चर्चांमध्ये किती दम आहे, हे मात्र पोलिस चौकशीत लवकरच निष्पन्न होईलच !