50 खोके एकदम ओके म्हणत नोंदविला भाजप व शिंदे सरकारचा निषेध!!
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (15 Feb. 2023) बुलढाणा येथे शनिवार 11 फेब्रुवारी रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन सुरु होते. या आंदोलनामध्ये आंदोलन कर्ता शेतकरी व वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा जलियावाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती करणारा असल्याची म्हणत मोताळा तालुका काँग्रेसने आज बुधवार 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान मोताळा तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करुन पोलिस प्रशासन व सरकारचा निषेध नोंदविला. विविध घोषणाजीने तहसिल परिसर दणाणून गेला होता. यावेळी काँग्रेसच्यावतीने तहसिलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेसच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील भाजपा शासीत सरकारच्या काळात जगाचा पोशिंदा बळीराजा कधी नैसर्गीक आपत्तीच्या कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ त्यातच मालाला कमी भाव मिळाल्याने शेतीला लावलेला खर्चही निघाला नसल्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत असून कर्जबाजारी होत असल्याने शेतकरी आत्महत्येत मोठी वाढ होत आहे. हाच शेतकरी आपल्या पिकाला भाव मिळावा, पीक विम्याचे पैसे मिळावे या रास्त मागणीसाठी शेतकरीनेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी त्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष क्रुरपणे लाठीचार्ज करुन त्यांना बेदम मारहाण केली. बिचारा बळीराजा रात्रंनदिवस मेहनत करुन देशातील जनतेचे पोट भरतो, तो शेतकरी आज उपाशी आहे. शेती करणे त्यांना परवडत नाही.
भाजपा सरकारच्या काळामध्ये खते व बि बियाणे डिझेल, पेट्रोल महाग झाल्याने त्यांना शेती करणे परवडत नाही. यावर्षी नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान भरपाई म्हणून पीक विम्याचे रक्कम मिळावी, कापसाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलिसांनी हल्ला करुन त्या बातम्यांचे वार्तांकन करणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर सुध्दा पोलिसांनी राज्यसरकारच्या आदेशान्वये हल्ला केला, याचा काँग्रेसच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनामध्या तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर, माजी तालुकाध्यक्ष गणेशराव पाटील, प्रकाशराव बस्सी, भुजंगराव राजस, कैलास गवई, महेंद्र गवई, अभिजीत खाकरे पाटील, मुर्ती सरपंच श्रीकृष्ण खराटे, सुरेश इंगळे, सौ.उषा सतिष नरवाडे, मिलींद अहीरे, राजेंद्र उदयकार, योगेश उदयकार, अ.हसन अ.तोहर, अतिश इंगळे, किशोर चव्हाण, इरफान पठाण यांच्या काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
50 खोके एकदम ओके- गजानन मामलकर
शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे, पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा झालेच पाहिज, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध, केंद्रातील भाजप व राज्यातील शिंदे सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, काँग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…पन्नास खोके सरकारचे करायचे काय अशा घोषणाबाजी काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांनी देवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
मंत्री महोदयाच्या आदेशान्वये लाठीचार्ज झाला- गणेशराव पाटील
न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी शेतकरी रविकांत तुपकारांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत चालू होते, यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या रास्त मागण्या लावून धरल्या, परंतु यावेळी कोण्यातरी मंत्री महोदयाचा फोन आल्याने पोलिसांनी वृध्द शेतकऱ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करुन जलियावाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती केली, या घटनेचा माजी तालुकाध्यक्ष गणेशराव पाटील यांनी निषेध नोंदवित तशी परिस्थीती बुलढाणा येथे तयार केल्याचा आरोप त्यांनी केला.