टाकळी येथे भिषण आगीचा तांडव: गुरांच्या गोठ्याला आग लागून 7 लाखांचे नुकसान

2142

गाभण म्हैस, टिनपत्रे,चारा, कुटार व शेतीपयोगी साहित्य जळून खाक

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (16 ‍Feb. 2023) तालुक्यातील टाकळी (वाघजाळ) येथे रामेश्वर शिराळ व राजेंद्र शिराळ यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागून त्यामध्ये गोठ्यातील 1 गाभण म्हैस जळून खाक झाली. तसेच गोठ्यातील चारा, कुटार, शेतीचे साहित्य, टिनपत्रे असा एकूण 6 ते 7 लाखांचा माल जळून खाक झाल्याची घटना आज गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. टाकळी ग्रामस्थ व बुलढाणा अग्नीशमन दलांच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर वेळीच नियत्रंण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.

प्राप्त माहितीनुसार टाकळी येथे गावाच्या प्रवेशदाराजवळ रामेश्वर महादेव शिराळ व राजेंद्र वासुदेव शिराळ यांचा गुरांचा गोठा आहे. या गोठ्याला आज गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास प्रथम धूर नागरिकांच्या निदर्शनास आला त्यानंतर आगीने मोठे रुद्ररुप धारण केल्याने पाहता-पाहता 40 ते 50 टिनांचा गुराचा गोठ्यात आग पसरल्याने आगीचे मोठमोठे भडके उडत होते. गावातील 400 ते 500 नागरिकांनी पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. यावेळी शिवसेना नेते गुलाबराव शिराळ यांनी बुलढाणा येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी अग्नीशमन दलाचे कर्मचारी व नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने जवळपास आग 1 ते 2 तासात आटोक्यात आली. या आगीमध्ये रामेश्वर शिराळ व राजेंद्र शिराळ यांचे गोठ्यातील टिनपत्रे, शेतीपयोगी साहित्य, चारा, कुटार, 1 गाभण म्हैस असे एकूण 6 ते 7 लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे.कर्मचारी, तहसिलचे नैसर्गीक आपत्ती कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते. वृत्तलिहेपर्यंत नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रीया चालू होती.

गुलाबराव शिराळ यांची कर्तव्यदक्षता..
शिवसेना नेते गुलाबराव शिराळ हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. आज टाकळी गावात आग लागल्याची त्यांना माहिती मिळताच त्यांनी गावातील बोर मालकांना बोर चालू करुन गुलाबराव शिराळ व त्यांच्यासह गावातील 400 ते 500 महिला, पुरुष व लहान मुलांनी आग विझविण्याचा प्रयत्न करीत आग काही प्रमाणात आटोक्यात आणली होती. यावेळी त्यांनी बुलढाणा अग्नीशमन दल तसेच बोराखेडी पोलिस, मोताळा तहसिल कार्यालयाला सदर घटनेची माहिती देवून आग आटोक्यात आणली.