अवैध दारु विक्री विरोधात सामाजिक कार्यकर्ते सारंगधर सातव अ‍ॅक्शन मोडवर !

588

जयपूर येथील दारु बंदीसाठी 9 मे पासून उपोषण करणार

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (6.May.2023) जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात सहज मिळणाऱ्या अवैध दारु विक्रीमुळे अनेकांचे संसार उध्दवस्त झाले असून तरुण युवक मोठ्या प्रमाणावर दारुच्या आहरी जात आहे. दारुची वैध विक्री किंवा अवैध विक्री हे दोन्ही घातकच आहे. मोताळा तालुक्यातील जयपूर येथील अवैध दारु विक्रीबंद होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सारंगधर सातव यांनी रणशिंग फुकले असून दारु विक्री बंद करण्यासाठी 9 मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचे निेवेदन त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी तसेच मोताळा तहसिलदार व बोराखेडी ठाणेदारांना दिले आहे.

बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या जयपूर येथे राजरोसपणे सर्रास अवैध दारु विकी सुरु आहे. बोराखेडी पोस्टे.ला वारंवार तक्रारी करुन सुध्दा कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही. या दारु विक्रीमुळे गावातील तरुण युवक हे व्यसनाधीन होत असून यामुळे भांडणाचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. त्यामुळे गावात अशांतता वाढलेली असून महिला व नागरिकांमध्ये मोठा रोष वाढला आहे. नागरिकांचा पोलिस यंत्रणेवरचाच विश्वास उडत चालला आहे. सदर अवैध दारु विक्री बंद न झाल्यास 9 मे पासून सामाजिक कार्यकर्ते सारंगधर सातव हे जयपूर गावातील दारु विक्री बंद करण्यासाठी उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच बोराखेडी पोस्टे.चे ठाणेदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

ऑडीओ क्लीप व्हायरल..

सारंगधर सातव व पोलिसांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली असून त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सातव यांना एका दारु विक्रेत्याने मारहाण केल्याचा आरोप सुध्दा केला आहे. तसेच एस.पी.चे पथक व राज्य उत्पादन शुल्काचे कर्मचारी व ठाणेदार, एपीआय आले असल्याचा उल्लेख ऑडीओ क्लीपमध्ये असून खोटी तक्रार केली म्हणून सातवची दिल्लीला तक्रार सुध्दा करणार असल्याचा संवाद ऑडीओ क्लीपमध्ये आहे. आता 9 मे ला सारंगधर सातव उपोषण करतात की त्यापुर्वी काही तोडगा काढून त्यांचे उपोषण सोडविले जाते, हे ही पाहणे औत्सुकतेचे राहणार आहे.