तरोडा येथे युवा शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

890

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (5.May.2023) तालुक्यातील तरोडा येथे एका 40 वर्षीय शेतकरी पुत्राने कर्जबाजारीला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज 5 मे रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव संदीप शंकर सायखेडे असे आहे.

कधी कोरडा, कधी ओला तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी मोठा प्रमाणात मेटाकुटीस आला आहे. नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी शेतीला लावलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या कर्जबाजारी होवून आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. तरोडा येथील घरातील कर्ता पुरुष संदीप शंकर सायखेडे (वय 40) यांनी आज शुक्रवार 5 मे रोजी सततची नापीकी व कर्जबाजारीला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संदीप सायखेडे यांच्या वडिलांच्या नावे तरोडा शिवारात गट नं.19 मध्ये शेती आहे. शेतीवर स्टेट बँक मोताळा शाखेचे 54 हजार रुपये तसेच काही खाजगी कर्ज आहे. घरातील कर्ता पुरुष असल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत संदीप सायखेडे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी कुटुंबीयांनी सांगीतले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी 2.30 सुमारास शोकाकूल वातावरणामध्ये अंतिमसंस्कार करण्यात आले.