BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (8.May.2023) मोताळा वनपरिक्षेत्रातंर्गत असलेल्या खामगाव तालुक्यातील उमरा शिवारात गट नं.4 मध्ये बिबट्याने एका 4 वर्षीय वासरीला ठार मारल्याची घटना 8 मे रोजी उघडकीस आली. यामुळे शेतकरी संजय अंभोरे यांचे अंदाजे 15 ते 20 हजाराचे नुकसान झाले आहे.
वनविभागाचे जंगले मानवाने काबीज केल्यामुळे अनेक हिंस्त्र प्राण्यांनी गावाशेजारी असलेल्या शेतशिवारात हैदोस घातला आहे. तारापूर, तरोडा, रोहिणखेड शिवारात बिबट्याने जनावरांचा फडशा पाडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आज सोमवार 8 मे रोजी खामगाव तालुक्यातील उमरा येथील शेतकरी संजय शेषराव अंभोरे यांनी त्यांचे शेत गट क्र.4 मध्ये गोठ्यात जनावरांना बांधले होते, दरम्यान त्यांच्या 4 वर्षीय वासरीवर बिबट्याने हल्ला चढवित तिला ठार केल्याने त्यांचे अंदाजे 15 ते 20 हजाराचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा पश्चीम खैरखेड अतिरीक्त कार्यभार चिंचखेड नाथ वनरक्षक एस.एस.बहरुपे यांनी राजेंद्र अंभोरे व किशोर अंभोरे यांच्या समक्ष करुन अहवाल वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा)मोताळा कार्यालयाला सादर केला आहे.




























