वीज पडणार चिंता नको; दामिनी अ‍ॅप देणार जीपीएसनुसार वीज पडण्याची माहिती !

345

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (6.JUNE.2023) भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने वीज पडून जिवीतहानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी दिल्ली यांनी ‘दामिनी’ अॅप तयार केले या ॲपचा नागरिकानी उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मान्सून कालावधीत विशेषतः जून आणि जुलै महिन्यात वीज पडून जिवीत हानी होते. वीज पडून जिवीतहानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दामिनी अॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरीक, क्षेत्रिय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, गावस्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांनी अॅप डाउनलोड करून त्याचा वापर करावा.

20 मिनीटापुर्वी देते अ‍ॅपमध्ये दर्शविली जाते स्थिती

सदरचे अ‍ॅप जीपीएस लोकेशन नुसार कार्य करते. वीज पडण्याच्या १५ ते २० मिनिटापूर्वी सदर अ‍ॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. सदर अॅपमध्ये सभोवताल वीज पडत असल्यास त्या ठिकाणापासून सुरक्षितस्थळी जावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. अ‍ॅपमध्ये प्राप्त होणाऱ्या सुचनेनुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील नागरिकांना देऊन होणारी जिवीत हानी टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.