डोंगर शेवली परिसरात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला !

71

BNUन्यूज नेटवर्क..
चिखली(3Aug.2023) तालुक्यातील डोगर शेवली येथे मागील काही दिवसापासून वन्यप्राणी अस्वालाने मोठा धुमाकूळ घातला आहे. अनेकावर हल्ला करण्याच्या घटना सुध्दा घडलेल्या आहेत. सदर घटना ताज्या असतांना आज 3 ऑगस्ट रोजी शेतात जाणाऱ्या 30 वर्षीय शेतकऱ्यांवर सकाळी 7 वाजेच्या सुमारास अस्वालाने अचानक हल्ला चढवून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे.

डोंगर शेवली येथील शेतकरी सतिष दिनकराव सावळे (वय 30) हे आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास किन्होळा शिवारात असलेल्या शेतात जाण्यासाठी निघाले असता त्यांच्यावर डोंगर शेवली परिसरात अस्वालाने हल्ला चढवून त्यांच्या हातावर हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या शेतातील कामे सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करावी लागत आहे तर दुसरीकडे वन्यप्राणी अस्वालाच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देवून सदर वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.