चिंचपूर फाट्याजवळ मलकापूर-पुणे बस खड्डयात पडली; 10 प्रवाशी जखमी

77

बस विरुध्द दिशेच्या खड्डयात पडल्यामुळे झाला अपघात !

मोताळा-(18 NOV.2023) मलकापूर आगाराची पुणे येथे जाणारी बस मोताळा तालुक्यातील चिंचपूर फाट्याजवळ विरुध्द दिशेच्या खड्डयात पडल्याने यामध्ये 8 ते 10 प्रवाशी जखमी झाले. जखमीवर मोताळा येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारार्थ रुग्णवाहिकेने बुलढाणा हलविण्यात आले. सदर घटना आज रविवार 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.10 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

मलकापूर आगाराची बस क्र.एम.एच-40 एक्यू-6139 हे बस चालक अनिल मोरे हे मलकापूरवरुन पुणे येथे घेवून जात असतांना आज 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.10 वाजेच्या सुमारास चिंचपूर फाट्याजवळ खोल खड्डयात पडली. यामध्ये 10 प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून बसमध्ये 40 ते 50 प्रवाशी होते. बस खड्डयात पडल्याने आरडाओरडा झाल्याने स्थानिक चिंचपूर व डिडोळा येथील ग्रामस्थ मदतीस धावून जखमींना बाहेर काढले. जखमींना रुग्णवाहिकेने मलकापूर व बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. बसचालक अनिल मोरे हे सुध्दा जखमी झाले आहेत. प्रवाशांना दुसऱ्या बसची व्यवस्था करुन देवून पुण्याकडे रवाना करण्यात आले.

जखमींना वेळीच मदत मिळाली

घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे.ठाणेदार बळीराम गिते आपल्या सहकार्यांसह घटनास्थळावर पोहचवून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. जखमींना मलकापूर व बुलढाणा येथे पाठविण्यात आले. बस ही बुलढाणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खड्डयात पडली नसून ती विरुध्द बाजुला मलकापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खड्डयात पडल्याने अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची ‘अचूक’ माहिती मिळू शकली नाही.

जखमी झालेले प्रवाशी

सदर बसमध्ये राखी सावजी बुलढाणा, शिवा सरकटे पिंप्राळा मुक्ताईनगर, मनोज वाघ कुऱ्हा काकोडा, विश्वदीप वाघ कुऱ्हा काकोडा, अशोक सावजी बुलढाणा, आशुतोष कदम मलकापूर, मानसी सिरसाट पुणे, श्रेयस नितीन सिरसाठ पुणे हे आठ जण जमखी झाले. मलकापूर आगार व्यवस्थापकांना अपघाताबद्दल विचारले असता, ते घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सांगता येईल, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.