भाजपाचे हिंदुत्व घर पेटविणारे आहे: मोताळ्याच्या सभेत उध्दव ठाकरे कडाडले !

53

शिवसेनेची अभूतपूर्व सभा; हजारो शिवसैनिकांची उपस्थिती

मोताळा: केंद्र सरकारने उद्योगपतींची 40 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. त्यावढ्या पैशात भारतातील शेतकऱ्यांची दोनवेळा कर्ज माफी होवू शकली असती. शिवसेनेचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटविणारे असून भाजपाचे हिंदुत्व हे घर पेटविणारे आहे, अशी कडाडून टिका शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोताळा येथील जनसंवाद सभेला संबोधीत करतांना भाजपावर केली.

मोताळा येथील मलकापूर रोडवरील बुलडाणा अर्बन जवळ आज गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी जनसंवाद सभेत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी संजय राऊतांनी रुमाल फिरविला, तुम्हाला सरकार फिरवायचे आहे. कितीही मोठे हुकुमशाह आले तरी त्यांना गाडण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. मला शेतीतले काही समजत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या वेदना समजतात. नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात वचनाला जागत दोन लाखापर्यंतचे पीककर्जाला माफी दिली होती. मुंबईत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, उध्दव ठाकरे पुन्हा असे बोबायला लागेल, भाजपा मुंबई वेगळी करेल, अरे तुमचा दिल्लीतील कोणताही बाप आला तरी मुंबई वेगळी करु शकत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाचाही बाप आला तरी मुंबई वेगळी करणार नाही, अरे तुम्हाला माझा बाप चोरावा लागतो, तुम्ही कशाला दुसऱ्याच्या व स्वत:च्या बापाची पर्वा करता, असा टोला फडणवीसांना लगावला.

पुढे उध्दव ठाकरे यांनी भाजपा सरकार फक्त शेतकऱ्यांचा वापर करुन घेत असून त्यांना नुकसानीची भरपाई देत नाही. तर गुजरातला एकहजार कोटी रुपये मोंदीनी दिले. सर्व उद्योग धंदे गुजरातला नेले. सरकारला गुडघ्यावर आणण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. मी योगायोग मुख्यमंत्री झालो, भाजप व अमित शहाने शब्द मोडल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावून सरकार स्थापन करावे लागले. दिलेला शब्द तोडला हेच काय भाजपाचे हिंदुत्व. तुम्ही हिंदुत्व मानता , मी काँग्रेससोबत गेंल्याने हिंदुत्व मोडले तर तुम्ही राममंदीर लोकार्पण झाले त्यावेळी मोदी तुम्ही बसलेले होते, तेथे तुमच्या आजुबाजूला हिंदु धर्माचे शंकराचार्य का नव्हते? अस सवाल उपस्थित केला. अशोक चव्हाण व अजित पवार हे आमचे मिंधे व गद्दार आजरोजी तुमच्याजवळ आता कुठे गेले तुमचे हिंदुत्व, असा सवाल करीत भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना जवळ करतो, ज्यांचा जेवढा घोटाळा मोठा त्याला भाजपात तेवढे मोठे पद दिले जाते. 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवारला तुम्ही मिठी मारता शरम वाटत नाही का तुम्हाला? दाऊदच्या हस्तकाबरोबर व्यवहार केलेल्यांना तुम्ही मिठ्या मारता, देशद्रोह्याच्या जागेत इडीचे कार्यालय आहे, हेच का तुमचे हिंदुत्व, असा सवाल उध्दव ठाकरे यांनी भाजपाला विचारला. यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे व नरेंद्र खेडेकर यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.

एक बेंडूक खूप डराव-डराव करतो: संजय राऊत

बुलढाणा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे दगडाला जरी शेंदूर फासला तरी तो निवडून येईल. पण शेंदूर भगवा असतो, भगवा शेंदूर फासल्याशिवाय इथे कोणी निवडून येणार नाही. इकडचा एक बेंडूक तीकडे गेलेला आहे. तो खूप डराव-डराव करीत असतो. दोनचार महिन्यात निवडणूका येतील, त्या बेंडकाचे डराव-डराव कायमचे बंद करायचे. आमदार गेले, खासदार गेले पंरतु शिवसेना जागेवर असून ती जागेवरच राहील ही शिवसेना हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेची आहे. 2024 मध्ये मोदी पंतप्रधान होत नाही तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नसल्याचे, शिवसेना नेते खा.संजय राऊत म्हणाले.

‘गद्दारा’च्या छाताडावर बसून सभापती झालो: जालींधर बुधवत

मी उध्दव ठाकरे साहेबासोबत थांबल्याने माझे बोर्डावरचे फोटो फाडले म्हणून तुम्ही साहेबांच्या व जनतेच्या नजरेतला फोटो फाडू शकणार नाही. जिल्ह्यातील दोन आमदार, एक खासदार व एक माजी आमदार गेला तरी जिल्ह्यातील जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे. बुलढाणा बाजार समितीची निवडणूक सहा महिन्यापुर्वी लढलो, उबाठा पॅनल गदारांच्या छाताडावर बसून निवडूण आणीत सभापती झाल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत म्हणाले.

सभा घाटाखाली पण फोटो घाटावरच्यांचेच !

बुलढाणा विधानसभेत लीड देणाऱ्या घाटाखालील मोताळा तालुक्यात उध्दव ठाकरे साहेबांची मोठी विराट सभा पार पडली. सभेला सात ते आठ हजार लोकांची उपस्थिती होती. साहेबांची सभा असल्यामुळे हजारो महिला व पुरुष स्वयंस्फूर्तीने आले होते. सभा घाटाखाली झाली, परंतु शहरात लावलेल्या सर्वाधीक बॅनरवर घाटावरील नेत्यांचेच फोटो होते. तर घाटाखालील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे फोटो नगण्य बॅनरवर असल्याची सभास्थळी चर्चा होती.