परतीच्या पावसाने जिल्ह्याला ‘झोडपले’! नांदुरा, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक नुकसान

6

बुलढाणा: जिल्ह्यात परतीच्या पावसाने मागील चार दिवसापासून मोठे थैमान घातले आहे. दोन दिवसात 991.5 मि.मी. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका, कपाशी, तूर पिकांचे 1 लाख 47 हजार 15 हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले असून 577 गावातील 1 लाख 29 हजार 511 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा व पेनटाकळी प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. नळगंगा धरणातून दोन दिवसापासून पाणी सोडण्यात येत आहे.

जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे बुलढाणा तालुक्यातील 48 गावाला तडाखा बसला असून 1725 शेतकऱ्यांचे 875 हेक्टर क्षेत्रावरील, चिखली तालुक्यातील 5 गावातील 3348 शेतकऱ्यांचे 26 हजार हेक्टर क्षेत्र, मोताळा तालुक्यातील 116 गावातील 21 हजार 182 शेतकऱ्यांचे 18 हजार 240 हेक्टर, मलकापूर तालुक्यातील 78 गावातील 1 2 हजार 570 शेतकऱ्यांचे 24 हजार 901 हे.क्षेत्र, खामगाव तालुक्यात 18 गावातील 389 शेतकऱ्यांचे 268 हे.क्षेत्र, नांदुरा तालुक्यातील 92 गावातील 24 हजार शेतकऱ्यांचे 31 हजार 513 हे.क्षेत्र, जळगाव जामोद तालुक्यातील 110 गावातील 32 हजार 68 शेतकऱ्यांचे 30 हजार 813 हे.क्षेत्र, संग्रामपूर तालुक्यातील 106 गावातील 32 हजार 980 शेतकऱ्यांचे 37 हजार 307.65 हे.क्षेत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील 4 गावातील 1249 शेतकऱ्यांचे 498 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कपाशी, तूर व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शेगाव, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मलकापूर तालुक्यातील 65 हेक्टर शेतजमिन खरडून गेली आहे.

मलकापूर तालुक्यात एकाच दिवसी साडेचार इंच पाऊस

जिल्ह्यात 12 ऑक्टोबर रोजी 632.1 मि.मी. तर 14 ऑक्टोबर रोजी 359 मि.मी. असा 991 मि.मी पाऊस झाला. मलकापूर तालुक्यात सर्वाधिक 213 मि.मी.म्हणजेच 8.3 इंच एवढा ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस पडल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 112 टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक जळगाव जामोद तालुक्यात 168 टक्के, शेगाव तालुक्यात 145.70 टक्के तर मलकापूर तालुक्यात 154.69 टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात 3822.6 मि.मी. म्हणजेच 150 इंच पाऊस जास्त असून मलकापूर तालुक्यात 14 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत 117.2 मि.मी.म्हणजेच 4.6 इंच पाऊस झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

 

अ‍ॅड.सतिषचंद्र रोठे व संगीताताई राठोड यांनी केली पाहणी

बुलढाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्र विकास आघाडी तथा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अ‍ॅड.सतिषचंद्र रोठे यांनी तीघ्रा, वरूड, मोताळा, रिधोरा, चिंचपूर, डिडोळा, जयपूर,जनूना,तरोडा आदी गावांना भेटी देत प्रत्यक्ष पाहणी करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तर 14 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.संजय राठोड यांच्या सुविद्य पत्नी सौ.संगिताताई संजय राठोड यांनी मोताळा तालुक्यातील टाकळी, वाघजाळ, बाम्हंदा, खांडवा परिसरातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करीत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकटातून सावरण्यासाठी तातडीने सरकारने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.