शहरातील प्रभाग क्र.16 मधील घटना; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण !!
मोताळा: चोरट्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आपले नेटवर्क सक्रीय करुन प्रभाग क्र.16 नविन मलकापूर रोड येथे घरफोडी करुन घरातील 5 लक्ष 12 हजार 387 रुपयांचे दागिणे लंपास केल्याची घटना 26 ऑक्टोबर रोजी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेमुळे शहरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे बोराखेडी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.
मोताळा शहरात प्रभाग क्र.16 नविन मलकापूर रोड, मोताळा येथे न्हावकर कुटुंबीय राहतात. अमोल शिवाजी न्हावकर व त्याचे कुटुबीय दिवाळीच्या सामान खरेदीसाठी 26 ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करीत देवघरातील तीन्ही कपाटात ठेवलेले सोन्याचे ईअर रिंग 6 ग्रॅम 32 हजार 742 रुपये, जेन्टस रिंग 6 ग्रॅम 32 हजार 742 ,लेडीज रिंग 3 ग्रॅम 17 हजार 433 रुपये, दोन पट्टी पोथ 52 ग्रॅम 3 लक्ष 29 हजार 470 रुपये, लहान बाळाच्या सोन्याच्या 6 अंगठ्या व तीन बाया 63 ग्रॅम 1 लक्ष असा एकूण 5 लक्ष 12 हजार 387 रुपयांच्या सोन्याचे दागिणे लंपास केल्याच्या अमोल न्हावकर यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331 (3), 331 (4), 305 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील पोलिस करीत आहे. सध्या दिवाळीचा सण असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सदर चोरट्यांना पकडण्याचे बोराखेडी पोलिसांसमोर ‘त्या’ अज्ञात चोरट्याला पकडण्याचे एक मोठे आव्हान आहे.
रात्री नऊ वाजता घडना आली उघडकीस
दिवाळी सण असल्यामुळे फिर्यादी अमोल न्हावकर हा आई श्रीमती सुनिता न्हावकर, बहिण प्रतिभा थेरोकार यांच्यासोबत दिवाळीचे सामान खरेदी करण्यासाठी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता बुलढाणा गेला होता. त्याने आई व बहिणीला जयस्वाल चौक, बुलढाणा येथे सोडून तो ड्युटीवर गेला. रात्री 9 वाजेच्या सुमारास सर्व कुटूंबीय घरी आले असता त्यांना घराचे कुलूप दिसले नसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता तीन्ही कपाटातील 5 लक्ष 12 हजार 387 रुपयांचे दागिणे लंपास केल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली घटनास्थळाची पाहणी
मोताळा शहरात झालेल्या चोरीची माहिती मिळताच बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील व बोराखेडी पोलिस निरिक्षक सारंग नवलकार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरीच्या घटनेचे गांभीर्य पाहता डॉग स्कॉड राणीला घेवून पोकाँ.बबन जाधव व विलास पवार यांचे पथक घटनास्थळी पोहचले. चोरट्यांनी काहीही पुरावे ठेवले नसल्याने राणीही चोरट्यांचा शोध घेण्यात अपयशी ठरली.