मोताळा- मृत्यू अटळ सत्य आहे. कोणाचा मृत्यू कुठे व केंव्हा होईल हे सांगता येत नाही. अशीच एक दुदैवी घटना बोराखेडी-वडगाव रोडवर पुन्हई फाट्याजवळ आज 2 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये नाईक कॉलनी मोताळा येथील प्रभाकर जवरे यांचा मृत्यू झाला. तर डिडोळा येथील सचिन खंडागळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरातील नाईक कॉलनी येथील प्रभाकर दत्तात्रय जवरे (वय 55) यांची पुन्हई शिवारात शेती आहे. ते शेतीचे कामे आटोपून सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने मोताळ्याकडे येत होते. तर डिडोळा येथील सचिन समाधान खंडागळे हा 23 वर्षीय युवक वडगावकडे जात होता. दरम्यान जवरे व खंडागळे यांच्या दुचाकींच्या पुन्हई फाट्याजवळील एका वळणावर जबर धडक झाली. या धडकेत प्रभाकर जवरे यांच्या डोक्यात मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रभाकर जवरे यांना 108 ॲब्युलन्सने जिल्हा सामान्य रुगालय, बुलढाणा येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तर सचिन खंडागळे गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.