बुलढाणा- जिल्ह्यात 7 मतदारसंघात घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार 23 नोव्हेंबर रोजी दुपारपर्यत जाहिर देखील होईल. तोपर्यंत धकधक वाढली आहे. कोणत्या मतदार संघात कोणता उमेदवार विजयी गुलाल उधळणार? कोणाला पराभव पत्करावा लागेल. सोशल मिडीया व एक्झीट पोलचा निकाल किती टक्के खरा ठरतो. 115 उमेदवारामध्ये गड कोण जिंकणार? कोण गड राखणार ? याचे चित्र शनिवारी दुपारपर्यंत क्लिअर होईल. मात्र, तोपर्यत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात गड कोण जिंकणार ? 47 टक्के मतदार घेणारा उमेदवार निवडून येईल का?
सस्पेंन्स मात्र कायम..!
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड व उबाठा शिवसेनेच्या जयश्रीताई सुनिल शेळके यांच्यामध्ये ‘काटे की टक्कर’ होणार आहे. खामगाव मतदार संघात काँग्रेसचे माजी आ.दिलीपकुमार सानंदा व भाजपाचे विद्यमान आ.आकाश फुंडकर यांच्यात, चिखली मतदारसंघात काँग्रेसचे भाजपचे विद्यमान आ.श्वेताताई महाले व काँग्रेसचे माजी आ.राहुल बोंद्रे , सिंदखेड राजा मतदार संघात मात्र राजकीय गणित बदलले असून तिघामध्ये काटे की टक्कर झाल्याचे बोलले जाते मात्र, खरी टक्कर दोघांमध्ये झाल्याची वार्ता असून, येथे विद्यमान आ.राजेंद्र शिंगणे, मनोज कायंदे व माजी आ.शशिकांत खेडेकर यांच्यात चुरशीची लढत होण्याच चित्र आहे. जळगाव जामोद मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आ.डॉ.संजय कुटे व काँग्रेसच्या डॉ.स्वातीताई वाकेकर, मेहकर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आ.संजय रायमूलकर व उबाठा.शिवसेनेचे सिध्दार्थ खरात तर मलकापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विद्यमान आ.राजेश एकडे व भाजपाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यामध्ये लढत होणार असून कोण बाजी मारते? कोण गड राखतो, कोण गड जिंकतो हे शनिवारी कळेल, मात्र तोपर्यंत कित्येकाच्या ‘दिलाची धडकन’ वाढणार आहे.
2019 मध्ये चार विद्यमान आमदार झाले होते पराभूत..!
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मलकापूर मतदार संघामध्ये काँग्रेसचे राजेश एकडे यांनी 86276 मते घेवून भाजपाचे विद्यमान आ.चैनसुख संचेती यांचा 14 हजार 384 मतांनी पराभव केला होता. बुलढाणा मतदारसंघात संजय गायकवाड यांनी 67785 मते घेवून वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांचा 26 हजार 75 मतांनी पराभव केला. तर काँग्रेसचे विद्यमान आ.हर्षवर्धन सपकाळ हे तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 31316 मते मिळाली होती. जळगाव जामोद मतदारसंघात भाजपाचे विद्यमाने आ.संजय कुटे यांनी 102735 मते घेवून काँग्रेसच्या डॉ.स्वातीताई वाकेकर यांचा 35231 मतांनी पराभव केला होता. खामगाव मतदारसंघात भाजपाचे आकाश फुंडकर यांनी 90757 मते घेवून काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील यांचा 16968 मतांनी पराभव केला होता. चिखली मतदार संघात भाजपाच्या श्वेताताई महाले यांनी 93515 मते घेवून काँग्रेसचे विद्यमान आ.राहुल बोंद्रे यांचा 6810 मतांनी भराभव केला होता. सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी 80661 मते घेवून शिवसेनेचे विद्यमान आ.शशिकांत खेडेकर यांचा 8650 मतांनी पराभव केला होता. मेहकर मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आ.संजय रायमूलकर यांनी 112038 रेकॉर्डब्रेक मते घेवून काँग्रेसचे अॅड.अनंत वानखेडे यांचा 62202 मतांनी पराभूत केले होते.
बुलढाणा मतदार संघात ‘भाऊ’ की ‘ताई’?
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान काँग्रेसचे विद्यमान आ.हर्षवर्धन सपकाळ, वंचितकडून माजी आ.विजयराज शिंदे, शिवसेनेकडून संजय गायकवाड व अपक्ष म्हणून योगेंद्र गोड हे चार दिग्गज निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत संजय गायकवाड 67785 मते घेवून विजयी झाले. तर विजयराज शिंदे 41710 मते घेवून द्वितीय क्रमांकावर होते. मात्र, विद्यमान आ.हर्षवर्धन सपकाळ 31316 मते मिळाल्याने ते तृतीय तर योगेंद्र गोडे यांना 29943 मते मिळाल्याने चौथ्या क्रमांकावर होते. आता 2024 मध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आ.संजय गायकवाड व महाविकास आघाडी उबाठा.शिवसेनेच्या जयश्रीताई शेळके यांच्यामध्ये लढत होणार असून मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल? उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र, यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 80 ते 90 हजार मते आवश्यक असून जो उमेदवार 46 ते 47 टक्के मते घेईल तोच विजयी होईल, म्हणजे त्यांचा लिड 22 ते 26 हजाराचा असेल, दोन उमेदवारांना 80 ते 80.90 टक्के तर इतर सर्व उमेदवारांच्या पारड्यात 19.10 टक्के मतदार जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे, एवढे मात्र निश्चीत!