रायपूर : बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील एका 48 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. सदर दुदैवी घटना आज शुक्रवार 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याचे नाव प्रभाकर सुधाकर खेंते असे आहे.
पिंपळगाव सराई येथील रहिवासी प्रभाकर खेंते यांच्याकडे दीड एकर शेती आहे. त्यावरच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. मागील काही वर्षापासून शेतीला लावलेला खर्चही निघाला नसल्याने खेते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यात शेतमालाला भाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत होता. त्यांच्यावर पिंपळगाव सराई येथील भारतीय स्टेट बँकेचे 57 हजार रुपयांचे कर्ज होते. कर्ज कसे फेडावे? कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा? या विवंचनेत प्रभाकर खेनते यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, आई, २ भाऊ असा आप्त परिवार आहे. गजानन खेनते यांच्या फिर्यादीवरुन रायपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.