खते व बियाण्यांची जादा दराने विक्री करणाऱ्यांची खैर नाही; जिल्हा व तालुकास्तरावर 14 भरारी पथके तैनात

8

तक्रारी नोंदविण्याचे जिल्हा गुणवत्ता निरिक्षकांचे आवाहन

बुलढाणा (शासकीय वार्ता) खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे. हंगामामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता पुर्ण कृषी निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके योग्य दराने उपलब्ध व्हावी तसेच कृषी निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी, जादा दराने, साठेबाजी व अनाधिकृत कृषी निविष्ठांची विक्री करणे, अशा प्रकारच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. असे प्रकार निर्देशनात आल्यास तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बुलढाणा यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यामध्ये 1 व जिल्ह्यास्तरावर 1 असे एकुण 14 भरारी पथक नेमण्यात आले आहे. या भरारी पथकांमार्फत तपासणी तसेच कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना योग्य ती खते, बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील सन 2024-25 मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुणनियंत्रण विषयक बियाणे नमुने-1312, खते-619, किटकनाशके-231 कृषि निविष्ठाचे नमुने काढून 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. तर 116 केंद्रांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. तसेच बियाणे- 174, खते-28, किटकनाशके-14 विक्री बंद आदेश देऊन संबंधीत कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे.

11 कंपन्यावर गुन्ह दाखल
सन 2024-25 मध्ये कंपनी विरूध्द बियाणे-5, खते-5, किटकनाशक- 1 असे एकुण 11 विविध कंपन्यावर कोर्ट केस दाखल करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात 2025 च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने शासनाकडे 1,72,750 मे. टन खतांची मागणी केली आहे. कृषी विभागांतर्गत गुणवत्ता नियंत्रणासाठी भरारी पथकामार्फत दर माहिन्याला अचानक तपासणी करण्यात येत आहे.