मोताळा- मोताळा शिवारातील एका शेतातून सोलर प्लॅन्ट कंपनीच्या 9 लाख 77 हजार 500 रुपयांच्या 115 प्लेटा चोरीला गेल्याची घटना 19 एप्रिल रोजी उघडकीस आली. कंपनीचे कर्मचारी सुनिल उबरहंडे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी खासगी सुरक्षागार्ड, सुपरवायझरसह इतर दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 93 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पकडल्याची माहिती समोर आली आहे.
मोताळा येथील सोलर प्लॅन्टचे खासगी कर्मचारी सुनिल तेजराव उबरहंडे छत्रपती नगर, बुलढाणा यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की, मोताळा शिवारातील ज्ञानेश्वर शिवाजी देशमुख यांचे शेतात सोलर कंपनीच्या प्लेटा ठेवलेल्या आहेत. तेथे विठ्ठल शिवाजी शेळके रा.तिघ्रा हे खासगी सुरक्षागार्ड तर गोपाल अजाबराव देशमुख हे सुपरवायझर म्हणून ड्यूटीवर असतांना त्यांनी अनुप कैलास खर्चे, निलेश शिवाजी देशमुख यांच्यासोबत संगणमत करुन कंपनीचे मालकिच्या 115 सोलर प्लेटा किेमत अंदाजे 9 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. त्यातील अनुप खर्चे यांच्या शेताची पाहणी केली असता तिथे 93 हजार 500 रुपयांच्या 11 प्लेटा दिसून आल्याच्या उबरहंडे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त चार जणांवर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303 (2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र कपले हे करीत आहे.
- इतर मुद्देमाल पकडण्याचे मोठे आव्हान
सोलर कंपनीच्या 9 लाख 77 हजार 500 रुपयांच्या 115 प्लेटा चोरीला गेल्या आहेत. त्यापैकी 11 प्लेटा पकडल्या आहे. इतर 104 प्लेटा कोणी चोरुन नेल्या? त्या कुठे ठेवल्यात? कोणाला विकल्या, याचा शोध लावण्याचे बोराखेडी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. ते पोलिस कसे पेलतात, पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.